अखेर अविनाश जाधव यांना पोलिसांनी सोडलं! मोर्चात सहभागी होत म्हणाले...

08 Jul 2025 16:06:43

मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरमध्ये सध्या वातावरण तापले असून पोलिसांनी ताब्यात घेतलेले मनसे नेते अविनाश जाधव यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी सुटका करताच त्यांनी मोर्चात सहभाग घेतला.

मंगळवार, ८ जुलै रोजी मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे आंदोलनस्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांकडून अनेक आंदोलकांची धरपकडही करण्यात आली.

या मोर्चापूर्वीच मनसे आणि उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास काशिमीरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अखेर आता पोलिसांनी त्यांना सोडले आहे. सुटका होताच अविनाश जाधव मोर्चात सहभागी झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, "प्रत्येक घराघरात आजचे मराठीचे आंदोलन गेले आहे. यापुढे महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसांच्या बाबतीत असे घडले तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी."

प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत घडले ते योग्य नाही!

"प्रताप सरनाईक यांच्या बाबतीत जे घडले ते योग्य नाही. ते मराठी माणूस म्हणून इथे आले होते. मराठी माणसाला मोर्चा का काढू दिला नाही, यासंदर्भात ते आज सकाळपासून बोलत होते. त्यामुळे जर एखादा मराठी माणूस आपल्या सोबत येत असेल तर त्याला प्रेमाने सोबत घेतले पाहिजे," असेही अविनाश जाधव म्हणाले.


Powered By Sangraha 9.0