वसा स्त्री आरोग्याचा

08 Jul 2025 11:38:50

Women health
 
स्त्री-आरोग्य ही समाज आरोग्याची खरी पायाभूत गरज आहे. पण, दुर्दैवाने महिलावर्गाकडून आणि कुटुंबीयांकडूनही याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यासाठी स्त्रीच्या आयुष्यातील चार प्रमुख टप्पे समजून घेऊन, त्यानुसार आहार-विहार-आचाराचा अवलंब केल्यास, स्त्री-आरोग्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच मार्गदर्शक ठरु शकतो. त्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...
 
बाळंतपणात रिया अगदीच हडकून गेली होती. अर्थात बाळंतपणातील औदासिन्याने तिला ग्रासले होते. त्यामुळे बाळाला दूध पाजणे, सांभाळणे तिच्याकड़ून होत नव्हतेच. पण, त्याहीपेक्षा घरातल्या माणसांशी, नवर्‍याशी तिचे नातेसंबंध अगदी बिघडून गेले होते. तिच्या आजाराची नीटशी कल्पना कुणालाच नव्हती. त्यामुळे तिच्यावर उपचारही झाले नाहीत. त्याचा दूरगामी परिणाम तिच्या प्रकृतीवर झालाच, पण त्याहीपेक्षा कुटुंब आरोग्य हरवून बसले. स्त्रियांना आरोग्याचा आत्मविश्वास मिळवून देणे व त्यांना आनंदी करणे हे कुटुंबसौख्य व समाजआरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे पावलोपावली जाणवत राहते.
 
मनोगत घरोघरीच्या स्त्रीशक्तीचे...
 
होय, मी स्त्री असल्याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. दया, सहानुभूती, प्रेम, शांती, कोमलता, कर्तबगारी यांसारख्या दागिन्यांबरोबर नवनिर्मितीची झळाळी माझी अखंड सोबत करते, असे प्रत्येकीला वाटायला हवे.
 
स्त्री आयुष्याच्या वळणवाटा
 
बाला, मुग्धा, प्रौढा, प्रगल्भा अशा चार टप्प्यांवर स्त्रीचे सारे आयुष्य पुढे सरकते.
वयाच्या 12व्या वर्षापर्यंत बाला अवस्था, 25 वयापर्यंत मुग्धा, लग्न-बाळ होणे ही प्रौढा अवस्था, पाळी जातानाच्या वयात प्रगल्भा अवस्था अशा वयाच्या सार्‍याच वळणांवर स्त्रीशरीरात हॉर्मोन्सचे अनेक बदल घडून येतात. त्यांचा तिच्या मनावर वागणुकीवरही परिणाम होतो. पण, प्रत्येक अवस्थेत प्रसन्नता टिकून राहणे हेच स्त्रीच्या सर्वांगीण आरोग्याचे रहस्य आहे.
 
आनंद व उत्साहाचे रहस्य
 
‘हार्मोन्स’ किंवा ‘अंतःस्राव’ हा शब्द काढला की मुळातच त्यापासून होणार्‍या त्रासांची यादी निघते. पण, स्त्री विशिष्ट हार्मोन्स ही एक देणगीच आहे व ती स्त्रीच्या अखंड आनंदी व उत्साही राहण्याची गुरुकिल्ली आहे. ती वापरायची कशी, हे आपल्या हाती आहे.
पावसाळा आल्यावर डोंगरकड्यांतून आपोआप वाहणार्‍या धबधब्याप्रमाणे ही अंतःस्रावाची ऊर्जा स्त्रियांना नेहमीच उपयोगी ठरते.
 
नियोजन महत्त्वाचे
 
या ऊर्जेचे रुपांतर कार्यशक्तीत करायचे की न वापरल्याने येणार्‍या आजारात करायचे, याचे नियोजन आपल्याच हाती आहे.
1) माझा वेळ माझ्यासाठी...
2) माझा आहार सर्वांत महत्त्वाचा
3) योग्य जीवनशैली माझी जवळची मैत्रीण
4) माझा संवाद माझ्या शरीर-मनाशी
5) माझ्या मर्यादा मलाच माहीत आहेत.
असे कानमंत्र आपण आपल्याबरोबर आपल्या सखी-शेजारणींमध्येही फिरवले की बर्‍याच गोष्टी सोप्या होतील.
 
आहार सर्वाधिक महत्त्वाचा
 
स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर-
 
1) जेवणाचे स्वरुप
2) जेवण पचण्याची ताकद
3) जेवण-पोषण यांचे समीकरण
या गोष्टी जुळणे खूप महत्त्वाचे असते.
 
1) बाला : लहानपणी शरीराची हाडे बळकट होणे, गर्भाशयाची परिपूर्ण वाढ होणे व संपूर्ण आयुष्याचा पाया रचला जाणे, यासाठी उत्तम आहाराला पर्याय नाही. आहार योग्य पद्धतीने घेतल्यानंतर त्यातील सूक्ष्म पोषकांशाचे पचन व शोषण होऊन शरीर घडतेच, पण मनाची शक्ती वाढायलाही मदत होते. लहान मुलींसाठी कॉपर, झिंक इत्यादी खनिजे परिपूर्ण वाढीसाठी उपयोगी असतात.
 
काय खायला हवे?
 
बाजरी, सातू, हरभरा, कुळीथ, मसूर, वाल, नाचणी, सोयाबीन, राजमा, उडीद, खसखस हळद, शिंगाडा, शेंगदाणा, ओवा, सुके खोबरे, मेथी, ओवा, मासे, काजू, तीळ, विड्याची पाने इत्यादी गोष्टी नावीन्यपूर्ण रितीने मुलींच्या जेवणात असल्या पाहिजेत. आमलकी (आवळा) ही वनौषधी या टप्प्यावर सखी ठरेल. यामुळे लोह तत्त्वाचे शरीरात शोषण व्हायलाही मदत होते.
 
2) मुग्धा : पाळी सुरू होऊन लग्न व बाळ होईपर्यंतच्या या काळात स्त्रियांच्या प्रजननांगांची सर्वांगीण वाढ, त्यांचे आरोग्य टिकणे, वेळेवर पाळी येणे, बीजनिर्मिती होणे यासाठीसुद्धा आहाराचा मोठा उपयोग आहे.
 
कृत्रिम रंगद्रव्ये, रासायनिक पदार्थ, शिळे, विकतचे पदार्थ (प्रोसेस्ड फूड) इत्यादी गोष्टींमुळे स्त्रियांमधील चैतन्य हरवून जात आहे की काय, यावर विचार करण्याची वेळ आली आहे. थकलेल्या मुली-स्त्रियाच सध्या जास्त आढळतात.
 
मग काय खायला हवे?
 
आहारातील मॅग्नेशियममुळे मनःशांती मिळते व यांच्या अभावामुळे स्नायू थकतात. प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी जेवणात बदाम, शेंगदाणे, काजू, केळी, दूध-ताक, तृणधान्ये, हिरव्या पालेभाज्या असल्या पाहिजेत.  लोह तत्त्वासाठी बाजरी, नाचणी, खजूर, गूळ, काळ्या मनुका, मुळा, हरभरा, मूग, पोहे, लोखंडी कढईत शिजवलेल्या हिरव्या पालेभाज्या हव्यात. सारी पोषणतत्त्वे मिळून ती पचत असतील, तर या वयातल्या मुली म्हणजे उत्साहाचा धबधबाच असतात. बडिशेप ही वनौषधी या टप्प्यावर स्त्रीसखी ठरते. पाळीच्या अनेक तक्रारी यांच्या योग्य वापराने दूर होतात.
 
3) प्रौढा : वयाच्या परिपक्व अवस्थेत बाळ होण्याची तयारी व गर्भारपण या मोठ्या जबाबदार्‍या पेलताना आहाराचा विशेष विचार करावा लागतो. गर्भारपणापूर्वी फॉलिक अ‍ॅसिड बाळांच्या परिपूर्ण मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असते. तृणधान्ये मोड येण्याच्या टप्प्यातील कडधान्ये, शेंगदाणे, सुकामेवा, हिरव्या पालेभाज्या यांतून हे मिळते. व्हिटामिन इत्यादी-तीळ, शेंगदाणा, सूर्यफूल सोयाबीन इत्यादी तेलांमध्ये, अंकुरित कडधान्ये-गहू, लोणी, तूप, अंडी यांतून मिळालेले हे पोषण तत्त्वे प्रजननकामात महत्त्वाचा सहभाग घेते.
 
गर्भारपणात आयोडिन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह तत्त्व इत्यादी गोष्टींची जास्त आवश्यकता असते. तीळ, जवस, विड्याची पाने, ताक, लोणी, तूप, राजगिरा, नाचणी, कढीपत्ता, शिंगाडा, कोहळा, लाल भोपळा, दुधी-भोपळा, हिरव्या पालेभाज्या, हिरवे मूग-गूळ+शेंगदाणा चिक्की इत्यादी गोष्टी जेवणात असाव्या. स्त्रीसखी शतावरी-गर्भारपणात खूप महत्त्वाचे काम करते, ही वनौषधी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापरावी.
 
4) प्रगल्भा : वयाच्या परिपूर्ण टप्प्यावर पाळी जाण्याच्या अवस्थेतून जाताना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. वजन नियंत्रणात ठेवणे ही कठीण असते. स्मरणशक्ती कमी होणे, वेगवेगळ्या वेदनांना तोंड द्यावे लागणे. या सगळ्यांना सामोरे जाण्यासाठी आहाराची विशेष व्यवस्था करणे, महत्त्वाचे असते, यात ‘अ‍ॅण्टी-ऑक्सिडंट’ अर्थात शरीर पेशींचे पोषण करणारी व्यवस्था येते. लेसिथीन नावाचे द्रव्यी मेंदूच्या पेशी बनवण्यात उपयोगी असते.
 
शेंगदाणे, तीळ, जवसाची चटणी, मोडाची मेथी, बदाम, अक्रोड, सूर्यफूल बिया, साजूक तूप यांचा वापर जेवणात जरुर करावा.
स्त्रीसखी-येष्टिका-ज्येष्ठीमध. यामुळे पाळी जाताना अंगातून उष्ण वाफा येणे अस्वस्थता, त्वचा-काळे डाग पडणे इत्यादी अनेक त्रास कमी होतात.
 
थोडक्यात महत्त्वाचे
 
आनंदी व उत्साही स्त्री, आनंदी कुटुंब, निरोगी समाज असे साधे गणित आहे. जर आपल्या हातात जग घडवायचे सामर्थ्य आहे, तर आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगायला हवा आणि आपल्या जेवणाचा विचार करायलाच हवा. पोषण हक्काचा संकल्प घरोघरी रुजवायलाच हवा.
 
आनंदी स्त्रीच्या कुशीत
सुखी बाळाचे भविष्य गुपित
हार्मोन्स जंजाळात
जबाबदारी घोळात
प्रसन्नतेचा हरवतोय झरा
आत्मविश्वास गमावतोय खरा
हिरव्या लेण्याचा साज
निसर्गाचा अप्रतिम बाज
हळूच खिडकीतून घरी यावा
जीवती पूजनाच्या भिंतीला
सजगतेचा मिळावा आसरा
नव्या युगाचा मंत्र नवा
स्त्री आरोग्य हक्काचा पायंडा
 
- डॉ. मधुरा कुलकर्णी 
Powered By Sangraha 9.0