कुणाल कामराविरोधात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

    07-Jul-2025   
Total Views |

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंजूर केला आहे. हा प्रस्ताव आता विधान परिषदेच्या हक्कभंग समितीकडे पुढील चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत कुणाल कामरा यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप या प्रस्तावात करण्यात आला होता. सभापती राम शिंदे यांनी या प्रस्तावाला सोमवारी मंजुरी दिली आणि तो हक्कभंग समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. आता विधान परिषदेची हक्कभंग समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करेल. समितीच्या तपासानंतर कुणाल कामरा यांना नोटीस पाठवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.