स्मार्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गणित, इंग्रजी विषय होणार सोपे

    06-Jul-2025   
Total Views |

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्रजी विषय आता अधिक रंजक आणि सोपे होणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या विषयांच्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजाव्या आणि त्यांना शिकण्याची गोडी लागावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने संपर्क फाऊंडेशनच्या सहकार्याने 'संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण' कार्यक्रम आयोजित केला आहे. शनिवार, दि. ५ जुलै रोजी दादर येथील गोखले रोडवरील महानगरपालिका शाळेत सुरू असलेल्या या प्रशिक्षणाला आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भेट दिली.

शिक्षकांशी संवाद साधताना आयुक्त गगराणी म्हणाले, "अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. शैक्षणिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजाव्यात, यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा." त्यांनी शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन पद्धती सुधारण्याचे आवाहन केले. या प्रसंगी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संदीप सांगवे, प्रशासकीय अधिकारी (शाळा) स्नेहलता डुंबरे यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेच्या १८१ शाळांमध्ये १८१ स्मार्ट टेलिव्हिजन आणि शैक्षणिक संकल्पनांवर आधारित उपकरणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या स्मार्ट टेलिव्हिजनच्या माध्यमातून गणित आणि इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी प्रत्येक शाळेतून एका शिक्षकाची निवड करण्यात आली असून, प्राथमिक विभागातील शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात आले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

आषाढी एकादशी वारीनिमित्त शाळेत छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत आयुक्त भूषण गगराणी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी केलेल्या पारंपरिक वेशभूषेची त्यांनी आवर्जून प्रशंसा केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिंडीतील विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रेही काढली. मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत 'अक्षर दिंडी'चे आयोजन करण्यात आले.





सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.