मुंबई : “राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसाबद्दलची तळमळ दिसली, तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि स्वार्थाची मळमळ दिसली”, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, दि. ५ जुलै रोजी केला. या मेळाव्यामुळे मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला आहे, असा टोलाही यांनी लगावला.
शिंदे म्हणाले,मेळावा मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी असल्याचे सांगितले गेले,परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणात द्वेष आणि वैफल्य दिसले."मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला? मुंबईतील मराठी लोकांचे प्रमाण का कमी झाले? मराठी माणूस वसई-विरार,नालासोपारा,बदलापूर,अंबरनाथ,वांगणीपर्यंत का ढकलला गेला?" असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांवर भाष्य केले. "राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी माणसासाठी तळमळ होती, पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता आणि खुर्चीसाठीची मळमळ दिसली,"अशी टीका त्यांनी केली."उद्धव ठाकरे सातत्याने माझ्यावर टीका करतात, पण मी त्यांना कामातून उत्तर दिले.त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षांनंतरच्या निवडणुकीत आम्हाला मोठा विजय मिळाला," असे शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यावर शिंदे म्हणाले, "आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला. पंतप्रधान मोदींनी याला तात्काळ मान्यता दिली. तरीही ठाकरे यांनी त्यांना सोडले नाही. हे दुर्दैवी आहे आणि यातून त्यांची वैफल्यग्रस्त वृत्ती दिसते." २०२२ च्या उठावाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले,"आम्ही अन्यायाविरुद्ध एकत्र आलो, तेव्हा उद्धव ठाकरे आडवे झाले. तेव्हापासून ते सावरले नाहीत.आता कोणाचातरी हात धरून ते परत उठण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत."
मराठी माणसाचा अपेक्षाभंग
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. यावर शिंदे म्हणाले, "लोकशाहीत कोणालाही युती करण्याचा अधिकार आहे. निवडणुका जवळ आल्यावर अनेक घडामोडी घडतील. राज ठाकरे यांनी मराठी माणसाबद्दल तळमळ व्यक्त केली, तर आदित्य ठाकरे यांनी स्वार्थ आणि सत्तेचा अजेंडा मांडला. यातून मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला आहे."
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.