ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! राज ठाकरेंचे मानले आभार

    05-Jul-2025
Total Views |


पंढरपूर:
नुकताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा पार पडला. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. शनिवार, ५ जुलै रोजी त्यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज ठाकरेंनी दोन बंधू एकत्र येण्याचे श्रेय मला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील. पण तिथे विजयी मेळावा होणार आहे, असे मला सांगण्यात आले होते. परंतू, त्याठिकाणी रुदालीचे भाषणदेखील झाले. मराठीबद्दल एकही शब्द न बोलता, आमचे सरकार गेले, सरकार पाडले, आम्हाला निवडून द्या, असे सुरु होते. त्यामुळे हा मराठीचा विजयी उत्सव नव्हता तर ही रुदाली होती. त्या रुदालीचे दर्शन आपण घेतले आहे," असा खोचक टोला त्यांनी लगावला.


'या' गोष्टीची त्यांना असूया!

"त्यांच्याकडे २५ वर्षे महानगरपालिका असतानाही दाखवण्याजोगे कोणतेही काम करू शकले नाहीत. पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. त्यांच्या काळात मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळ, पत्राचाळ आणि अभ्यूदय नगरच्या मराठी माणसाला हक्काचे मोठे घर त्याच ठिकाणी दिले. या गोष्टीची असूया त्यांना आहे. पब्लिक है सब जानती है, असे मी नेहमी सांगतो. त्यामुळे मुंबईतील मराठी असो किंवा अमराठी सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असल्याचा आणि मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदूत्वाचाही अभिमान आहे. आमचे हिंदूत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हिंदूत्व आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.