राहुल गांधींच्या नकारात्मकतेकडे देशाचे दुर्लक्ष – केंद्रीय मंत्री पियुष गोयल

    05-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नकारात्मकता पसरविण्याच्या धोरणामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला कोणीही गांभीर्याने घेत नाही; असा टोला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लगावला आहे.

भारत – अमेरिका व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टिका केली. त्या टिकेस केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांचे सहकारी आणि त्यांचा पक्ष सतत पसरवलेल्या नकारात्मकतेमुळे आता कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांनी भारतीय जनतेचा विश्वास गमावला असून त्यामुळेच देशाने वारंवार काँग्रेसला नाकारले आहे. आजपर्यंत ते देशाच्या विकासासाठी कोणताही सकारात्मक अजेंडा आणू शकलेले नाहीत, असे गोयल म्हणाले.

भारत – अमेरिका व्यापार कराराविषयी बोलताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, भारत कोणत्याही दबावाखाली अथवा मुदतीखाली वाटाघाटी करत असून राष्ट्रीय हित हे वाटाघाटी करताना केंद्रस्थानी असते. यापूर्वी काँग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या राजवटीत राष्ट्रीय हितास बाजुला ठेवले जात होते. मात्र, आता भारत आत्मविश्वासाने आणि ताकदीने वाटाघाटी करतो, असेही केंद्रीय मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले आहे.