मुंबई : उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ठाकरे बंधूंनी शनिवार, ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचं शोकगीत गायलं. पण मुख्यमंत्री असताना २०२२ मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचं उत्तर त्यांनी दिलंच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाही, तर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात."
"उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे. यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेनं आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे," असेही ते म्हणाले.