निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब 'तहात'...; मंत्री आशिष शेलार यांची टीका
05 Jul 2025 14:42:32
मुंबई : श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब 'तहात' जिंकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "भाषेसाठी नाही ही तर निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी आहे. महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता 'भाऊबंदकी' आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच आणि ते यांच्या लेखी नाहीच," अशी टीका त्यांनी केली.
"महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार आणि त्यासाठी सत्ता यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंब 'तहात' जिंकण्याचा प्रयत्न आहे,", असेही ते म्हणाले.