"मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोल"; उद्योजकाचं राज ठाकरेंना जाहीर आव्हान

04 Jul 2025 15:48:17


मुंबई : (Sushil Kedia) गेल्या महिन्याभरापासून मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या मराठी - हिंदी भाषेच्या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावरुन आव्हान दिले आहे. केडिया यांनी राज ठाकरे यांना एक्सवर टॅग करत 'आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा' अशी पोस्ट केली आहे.

व्यावसायिक सुशील केडिया यांनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. सुशील केडिया यांनी पोस्टमध्ये राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली असून आपण मराठी शिकणार नाही, अशी भूमिकाच स्पष्ट केली आहे. "राज ठाकरे, तुम्ही याची नोंद घ्या की, गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहूनही मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे घोर गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?", असं केडियांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.


मुंबईसह महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे, असा आग्रह मनसेकडून केला जात आहे. यासंदर्भात काही ठिकाणी उद्भवलेल्‌या स्थानिक वादांमध्येही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब वारंवार स्पष्ट केली आहे. प्रसंगी काही ठिकाणी मारहाणीच्याही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सुशील केडियांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.



Powered By Sangraha 9.0