पुतिन यांचा ऐतिहासिक निर्णय! अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला दिली मान्यता, असा करणारा रशिया पहिलाच देश

04 Jul 2025 14:09:08

Russia becomes First Country To Recognise Afghanistan

मॉस्को : (Russia becomes First Country To Recognise Afghanistan's Taliban Govt) रशियाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. रशियन सरकारने तालिबानने नियुक्त केलेले नवीन अफगाण राजदूत गुल हसन यांना स्वीकारताना रशियन सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. रशियाच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानात २०२१ मध्ये तालिबानच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिकृतपणे मान्यता देणारा रशिया पहिला देश ठरला आहे. जागतिक राजकारणात हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

या संदर्भात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, "आम्हाला विश्वास आहे की, इस्लामिक अमीरात ऑफ अफगानिस्तानच्या सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांतील विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याच्या विकासाला चालना मिळेल." दरम्यान, रशियाचे उप परराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को यांनी मॉस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमानंतर अफगाण राजदूत गुल हसन यांची भेट घेत त्यांचे प्रमाणपत्र स्वीकारले आहे.

मॉस्कोतील अफगाण दूतावासावर फडकला तालिबानचा पांढरा ध्वज

रशियन वृत्तसंस्था TASSने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये दिसून आले की, मॉस्कोमधील अफगाण दूतावासावर तालिबानचा पांढरा ध्वज फडकवण्यात आला आहे. दरम्यान, काबूलमधील तालिबान सरकारमधील अधिकाऱ्यांनी रशियाच्या या निर्णयाचे कौतुक करत या निर्णयामुळे दोन्ही देशातील संबंध मजबूत होण्यास मदत होईल असं म्हटलं आहे. तसेच तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी म्हटलं की, "आमच्या संबंधांच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे." ही एक नवी सुरुवात आहे, इतर देशही रशियाच्या पावलावर पाऊल ठेवत आम्हाला मान्यता देतील, अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तान सरकारने यानंतर दिली आहे.




Powered By Sangraha 9.0