Marathi vs Hindi Raw : मराठीचा आग्रह करू शकतो पण दुराग्रह नाही! व्यापाऱ्याला मारहाण प्रकरणात काय म्हणाले CM?

    04-Jul-2025   
Total Views |

मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा जरूर घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ४ जुलै रोजी लगावला.

विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा जरूर घ्यावा. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो. पण याच्या पाठीमागची भूमिकासुद्धा त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कमिटी तयार करणारे तेच, त्यात आपल्या उपनेत्याला टाकणारे ते, पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करा हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये घेऊन त्यावर निर्णय करणारे ते आणि आता विजयी मेळावा घेणारेही तेच आहेत. त्यामुळे कोण दुटप्पी आहे हे मराठी माणसाला लक्षात येते. हे दुटप्पी धोरण असून आमचा निर्णय पक्का आहे. आम्ही समिती तयार केली असून जे मराठी मुलांच्या हिताचे आहे तेच आम्ही करणार आहोत. कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही."

ही गुंडशाही योग्य नाही

"भाषेवरून मारहाण करणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवसाय करतात. त्यातील अनेकांना तिथली भाषा येत नाही. मग त्यांच्याशीसुद्धा अशीच वागणूक होईल का? भारतात ही गुंडशाही योग्य नसून त्यावर कारवाई केली जाईल. मराठीबद्दल खरा अभिमान असेल तर मराठीची सेवा करा. मराठी शिकवा. आपल्या मुलांनाही मराठी शाळेत शिकवा. आम्हाला मराठीचा अभिमान आहे पण भारतातील कोणत्याही भाषेवर असा अन्याय सहन केला जाणार नाही. त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल. मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही," असेही ते म्हणाले.

याचा अर्थ पवारांचे कर्नाटकवर जास्त प्रेम आहे का?

"याआधी चिकोडी येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे कर्नाटकवर जास्त प्रेम आहे असा होतो का? गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटले तर त्यांचे महाराष्ट्रावरचे प्रेम कमी झाले, इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणूस हा वैश्विक आहे. विरोधकांजवळ मुद्दे नसल्यामुळे ते असे मुद्दे उचलत आहेत," अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गाबाबत आमची भूमिका स्पष्ट

"सरकारची भूमिका स्पष्ट असून आम्ही शक्तिपीठ महामार्ग करणार आहोत. अडचणीच्या मुद्द्यांवर चर्चेतून मार्ग काढणार आहोत. सांगलीपर्यंत ६० ते ७० टक्के जागा कुठल्याही आंदोलनाशिवाय आम्हाला मिळेल. २० ते ३० टक्के जागेसाठी आम्हाला थोडी चर्चा करावी लागेल. कोल्हापूरमध्येही मोठ्या प्रमाणात लोकं भेटून जमीन घेण्यासंदर्भात निवेदन देत आहे. शक्तिपीठ महामार्ग हा आम्हाला आमच्या अहंकाराचे समाधान करण्यासाठी करायचा नसून हा महामार्ग मराठवाडा आणि दुष्काळी जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार आहे. कुठलेही नवीन काम हातात घेतल्यावर त्यात काही गैरसमज असतात. पण लोकशाहीमध्ये ज्याला अधिक लोकांचा पाठिंबा आहे ती गोष्ट केली पाहिजे. काही राजकारणी लोक यात जाणीवपूर्वक राजकारण आणत आहेत पण जनता आम्हाला साथ देईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....