मुंबई : काही लोक राजकारणासाठी मराठी-हिंदी वाद पेटवत आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी एक अस्त्र म्हणून मराठी भाषेचा वापर केला जात असून हे दुर्दैवी आहे, अशी टीका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंवर केली. शुक्रवार, ४ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री योगेश कदम म्हणाले की, "महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान केला जाऊ नये. एकमेकांच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळली पाहजे. महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. पण सगळ्याच भाषांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे. काही लोक राजकारणासाठी मराठी हिंदी वाद पेटवत आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी एक अस्त्र म्हणून मराठी भाषेचा वापर केला जात असून हे दुर्दैवी आहे. ज्या आमच्या सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, ते सरकार मराठी भाषेच्या विरोधात कधीच असू शकत नाही."
...तरच त्यांचे मराठी भाषेवरचे प्रेम सिद्ध होईल
"वरळीच्या मेळाव्याचे आम्हाला निमंत्रण नाही. ठाकरे बंधूंच्या उद्याच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गेलो तरच मराठीव प्रेम आहे असे अधोरेखित होत नाही. मराठी भाषेचे राजकारण करून पुढची येणारी निवडणूक जिंकण्यासाठीच हे सगळे सुरू आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी काय केले हे त्यांनी उद्या व्यासपीठावर सांगावे. तेव्हाच त्यांचे मराठी भाषेवरचे प्रेम सिद्ध होईल. उद्याचे व्यासपीठ फक्त राजकारणासाठी आहे. . राज ठाकरे यांच्या पक्षाची मते घेऊन महापालिका ताब्यात घेणे हाच त्यांचा हेतू आहे," अशी टीकाही योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....