मुंबई : (Maharashtra Weather Update) राज्यात सध्या काही भागात जोरदार पाऊस सुरू असतानाच हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ जुलै आणि ५ जुलैला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर कायम असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे घाटमाथ्यावरील आणि घाटाखालील वस्ती असणाऱ्या गावातील नागरिकांना सावधगिरी इशारा देण्यात आला आहे.तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका (BMC) आणि स्थानिक प्रशासनाने पाणी साचण्याच्या ठिकाणांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. हवामान खात्याने नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.हवामान खात्याने ४ ते ८ जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.