डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय! अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्युटीफूल बिल' मंजूर

04 Jul 2025 12:24:58

वॉशिंग्टन : (Donald Trump’s ‘One Big, Beautiful’ Bill passes in US Congress)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफूल बिल' गुरूवारी ३ जुलै रोजी रात्री उशिरा अमेरिकन काँग्रेसच्या प्रतिनिधी सभागृहात म्हणजेच 'हाऊस ऑफ रिप्रसेंटेटिव्ह'मध्ये २१८-२१४ मतांनी मंजूर झाले आहे. हे ८६९ पानांचे विधेयक आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. हा ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राजकारणातला ऐतिहासिक विजय मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी 'वन बिग ब्युटीफुल बिल'ची मोठी चर्चा सुरू होती. अमेरिकन काँग्रेस (संसद) मध्ये ट्रम्प यांचे टॅक्स अँड स्पेंडिंग विधेयक म्हणजेच 'वन बिग ब्युटीफुल बिल' अत्यंत कमी मतांच्या फरकाने मंजूर झाले आहे. आता त्यावर फक्त स्वाक्षरी होणे बाकी आहे. यापूर्वीच हे विधेयक अमेरिकेच्या सिनेट म्हणजेच 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये ५१-५० च्या फरकाने मंजूर करण्यात आले होते, ज्यासाठी उप-राष्ट्राध्यक्ष जे. डी व्हान्स यांनी निर्णायक मत दिले होते.

'वन बिग ब्युटीफुल बिल' म्हणजे काय ?

'वन बिग ब्युटीफुल बिल' हे अमेरिकेच्या संसदेने मंजूर केलेले एक महत्त्वाकांक्षी विधेयक आहे, जे सुमारे ४.५ ट्रिलियन डॉलरच्या कर कपातीशी संबंधित आहे.हे विधेयक मंजूर झाल्याने ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात केलेली करकपात कायम होईल, तसेच नवीन कर सवलत मिळेल आणि फेडरल नेट सेफ्टी प्रोग्राममध्ये कपात होईल. या विधेयकामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि नागरिकांवरील कराचा बोजा कमी होईल अशी अपेक्षा आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या विधेयकामुळे कर कपात, लष्करी खर्च आणि सीमा सुरक्षा मजबूत होऊ शकते. हे विधेयक ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक मोठे आर्थिक पाऊल मानले जात आहे.




Powered By Sangraha 9.0