उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर! 'या' कृतीने वेधले सर्वांचे लक्ष

    04-Jul-2025   
Total Views |

पंढरपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर असून गुरुवार, ३ जुलै रोजी ते पंढरपुरात दाखल झाले. दरम्यान, यावेळी त्यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीपूर्वी वारीतून पंढरपूरात जमणाऱ्या लाखो वारकरी बंधू भगिनींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला सारून मंदिरात नतमस्तक होत विठ्ठल रखुमाईचे मनोभावे मुखदर्शन घेतले. त्यांच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

त्यांनी पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी सुविधांचा, प्रामुख्याने रस्ते, पाणी, दिवाबत्ती आणि संपूर्ण शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला. यासोबतच मंदिर परिसर, दर्शनबारी, चंद्रभागेतील वाळवंट, पासष्ठ एकर परिसर येथे करण्यात आलेल्या सोयी सुविधांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. शहरात जागोजागी बसवण्यात आलेली फिरती शौचालये स्वच्छ आहेत की नाही, तिथे पाण्याची व्यवस्था आहे अथवा नाही यांचीही माहिती घेतली. तसेच वारकऱ्यांना पिण्यासाठी शुध्द पाण्याचा पुरवठा होतोय की, नाही याचीही माहिती घेतली. चंद्रभागेच्या तीरावर महिला आणि पुरुषांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सोय केलेली आहे अथवा नाही याचीही त्यांनी माहिती घेतली.

तसेच आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाने विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी आणि इतर वैद्यकीय सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. या शिबिरांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\