राज्यातील लाखों होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा! CCMP कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र वैद्यक परिषदेत सुरू होणार

    04-Jul-2025   
Total Views |

मुंबई : राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मॉडर्न फार्माकोलॉजीचा (CCMP) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी आता अधिकृतपणे महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC) च्या नोंदणी पुस्तकात केली जाणार आहे.

ही ऐतिहासिक सुधारणा माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार अनिल गलगली यांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे. त्यांनी 11 मार्च 2025 रोजी शासनाकडे पत्रव्यवहार करत ठोस मागणी केली होती. त्यांच्या मागणीत त्यांनी स्पष्ट केले होते की, "महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (सुधारणा) अधिनियम, २०१४" नुसार या डॉक्टरांची नोंदणी आवश्यक आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष होत होते.

अनिल गलगली यांनी पत्रात नमूद केले होते की २०१६ पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमार्फत CCMP कोर्स सुरू असून आतापर्यंत १५,००० पेक्षा अधिक डॉक्टरांनी कोर्स पूर्ण केला. CCMP कोर्स नोंदणी केल्याने त्यांच्या ऍलोपॅथी प्रॅक्टिसला कायदेशीर मान्यता मिळणार आहे आणि सरकारचा कोट्यवधींचा महसूल यामुळे वाचवला जाऊ शकतो.

डॉ. दिनेश साळुंके यांनी देखील या निर्णयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी स्वतः अनिल गलगली यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली आणि शासन स्तरावर अनेक अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधत हा विषय पुढे नेला.

पूर्वी या डॉक्टरांना ऍलोपॅथी औषधांच्या वापराची कायदेशीर परवानगी नव्हती. मात्र, CCMP कोर्सनंतर त्यांना ही परवानगी राज्य सरकारने दिली आहे. आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेत अधिकृत नोंदणीही सुरू झाल्यामुळे ही प्रॅक्टिस अधिकृत, कायदेशीर व सुरक्षित ठरणार आहे.

अनिल गलगली यांचा पुढाकार निर्णायक ठरला असून शासन, वैद्यक परिषद व आरोग्य विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार व जनहित मागण्या करून त्यांनी ही सुधारणा मंजूर करून घेतली. त्यामुळे हा निर्णय लाखो होमिओपॅथी डॉक्टरांसाठी नवा मार्गदर्शक ठरणार आहे.




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....