नवी मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार 1 ते 31 जुलै 2025 या कालावधीत‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’अभियान सर्वत्र राबविण्यात येत असून या अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
याचाच एक भाग म्हणून 2 व 3 जुलै रोजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात 2 दिवसात 52 ठिकाणी मलोरिया – डेंग्यू तसेच स्वच्छता आणि आरोग्य विषयक जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या 2 दिवसात याठिकाणी एकूण 22,690 नागरिकांनी भेट दिली असून त्यातील 1310 नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये 2 जुलै रोजी 11,536 नागरिकांनी तर 3 जुलै रोजी 11,154 नागरिकांनी भेट दिलेली आहे. तसेच 2 जुलै रोजी 688 आणि 3 जुलै रोजी 622 नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.
25 एप्रिलपासून 26 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 260 जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरांना 1,01,575 नागरिकांनी भेट देत माहिती करून घेतली असून 6,666 नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत.
स्वच्छता आणि आरोग्य याचा घनिष्ठ संबंध असून नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेसोबतच घर व आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला आणि गॅलरीतील, टेरेसवरील भंगार साहित्य जर योग्य रितीने नष्ट केले तर नागरिकांना पावसाळी आजार जसे की - साथरोग, हिवताप व डेंग्यू यापासून संरक्षण मिळेल याविषयी माहिती देऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.
सद्यस्थितीत नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये हिवताप व डेंग्यू रुग्णसंख्येचा तपशील :-
कालावधी - 1 जानेवारी 2025 ते 28 जुन 2025
* घेतलेले रक्तनमुने – 81,352
* हिवताप दूषित रुग्ण – 18
* संशयीत डेंग्यू – 162
* एन आय व्ही पुणे / सिव्हील हॉस्पिटल येथे पाठविण्यात आलेले रक्तजल – 55
* दूषित डेंग्यू रुग्ण – 02
स्वच्छता व आरोग्य ह्या एकमेकांशी सुसंगत बाबी आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपली वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता याची काळजी घेतली तर नवी मुंबईत साथरोग, हिवताप व डेंग्यू आजारावर आळा घालणे सहज शक्य होईल. तरी नागरिकांनी याबाबत जागरूकता राखत आपले नवी मुंबई शहर स्वच्छ राहण्यासाठी दैनंदिन कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक असे घरातूनच वर्गीकरण करावे तसेच परिसर स्वच्छ राहील याकडे लक्ष देऊन आरोग्यपूर्ण नवी मुंबईसाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.