"वारी म्हणजे देहाने चाललेली, पण आत्म्याला स्पर्शलेली यात्रा";'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीचा भावस्पर्शी अनुभव!

04 Jul 2025 14:19:36

amit bhanushali touching experience of tharal tar mag fame!



मुंबई : अलिकडेच स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अमित भानुशाली याने नुकताच पंढरपूरच्या आषाढी वारीचा अनुभव घेतला. मात्र त्याच्यासाठी ही फक्त एक धार्मिक परंपरा नव्हती, तर अंतर्मनाला स्पर्श करणारा एक आत्मिक प्रवास ठरला असा अनुभव अमितने आपल्या शब्दांत उलगडला.

वारीचा उल्लेख करताच अमितच्या अंगावर रोमांच उभे राहतात. तो म्हणतो, "वारी म्हणजे चालण्याचा प्रवास नाही, ती एका भक्ताच्या आत्म्याची यात्रा आहे." यावर्षी ‘माऊली महाराष्ट्रा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याला वारीचा भाग होण्याची संधी मिळाली, आणि हा योग त्याच्यासाठी एक भावनिक, अध्यात्मिक व अंतःकरणाला भिडणारा अनुभव ठरला.


वारीची सुरुवात आळंदीहून झाली ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं स्थान. त्या पवित्र भूमीत पाऊल ठेवल्यावर अमितला लहानपणीच्या आठवणींचा आणि श्रद्धेच्या नात्याचा नवा उजाळा मिळाला. “मी लहानपणी दरवर्षी आळंदीत जायचो, पण अभिनयाच्या धावपळीमुळे हे नातं मागे पडलं. या वर्षी पुन्हा तिथं गेलो आणि असं वाटलं, माऊली स्वतः म्हणाली, "किती वर्षं झाली बाळा, तू आला नाहीस… पण मी वाट बघत होते!" अशी भावना व्यक्त करताना त्याचे डोळे पाणावले होते.

वारीत चालताना हजारो वारकरी त्याच्या सभोवती होते, तरी त्याला वाटलं “मी आणि माझा विठोबा, इतकंच आहे.” गर्दीच्या मध्यातही एक शांत, स्फूर्तिदायक अनुभूती अमितच्या मनात साकार झाली. “पावसाचे थेंब, चिखल, भिजलेले पाय… काही जाणवत नव्हतं. पावलं चालत होती, पण थकत नव्हती,” असे तो म्हणतो.

वारीचा सार आत्मिक शुद्धतेत आहे, हे स्पष्ट करताना अमित म्हणतो, "इथे कोणताही टॅग लागत नाही. इथे कोणी अभिनेता नाही, कोणी डॉक्टर नाही  सगळेच भक्त. इथे खरी ओळख मिटते आणि उरतो तो फक्त भक्तिभाव." अंतिमतः, वारीने त्याला केवळ अध्यात्माची ओळख दिली नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाशी संवाद घडवून दिला. "वारी म्हणजे देवाच्या मांडीवर बसल्यासारखं वाटणं. शरीर थकलेलं असतं, पण आत्मा मात्र बहरलेला असतो," असा अनुभव सांगून अमित भानुशालीने एक नवाच, भावनिक आणि प्रेरणादायी अध्याय आपल्या जीवनात लिहिला आहे.

वारीतले हे क्षण, ही भावना, हा संवाद  सगळं काही शब्दांच्या पलीकडचं. पण ज्याने हे अनुभवले, त्याच्यासाठी ती संपूर्ण जीवनाला एक नवी दिशा देणारी यात्रा असते अगदी अमितसारख्यांसाठीही.


Powered By Sangraha 9.0