कोटी कोटी जनांच्या हिंदू धर्माला दहशतवादाचे गालबोट लावण्याचा प्रयत्न हाणून पडला : योगी आदित्यनाथ

31 Jul 2025 17:31:03

लखनऊ : “मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता हे ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचे जीवंत उदाहरण आहे. हा निर्णय काँग्रेसच्या भारतविरोधी, संविधानविरोधी आणि सनातन विरोधी चरित्र्यावर पुन्हा प्रकाश टाकतो. ज्यांनी ‘भगवा दहशतवाद’ ही नवी संकल्पना जनमानसात बिंबवण्याचा प्रयत्न केला.”, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेसवर केली आहे. मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व सात आरोपींना न्यायालयाने सुमारे १७ वर्षांनी निर्दोष मुक्त केले आहे.

मुख्यमंत्री योगी म्हणाले, “काँग्रेसने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या साधू संत, महंत आणि राष्ट्रसेवकांची छवी कलंकीत करण्याचे काम केले आहे. हा अपराधच आहे. काँग्रेसने आपल्या अक्षम्य कुकृत्यांचा स्वीकार करावा आणि देशाची जाहीर माफी मागावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींना एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आणि लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सातही आरोपी निर्दोष सुटले आहेत. त्यांच्याविरोधात कुठल्याही प्रकारे षडयंत्र रचल्याचा पुरावा आढळलेला नाही.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही केले स्वागत!

“१७ वर्षे हा इतका काळ आरोपींनी तुरुंगात घालवला. कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांना विनाकारण कोठडीत ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालाने हे सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. एका गोष्टीची आठवण करू देऊ इच्छितो की, जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्रात जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा युपीएचे सरकार होते. त्यांनी एक वाक्य म्हटले होते की, दहशतवादाचा कुठलाही धर्म नसतो. मात्र, मालेगाव बॉम्बहल्ला झाला तेव्हा त्यांनी हा भगवा दहशतवाद असल्याचे म्हटले होते. साध्वी प्रज्ञांसह इतरांना अडकवण्याचे हे षडयंत्र होते. भगव्याला बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, तो न्यायालयाच्या निर्णयामुळे हाणून पाडला आहे.”, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दिली आहे. नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Powered By Sangraha 9.0