कार्यकारिणीचा लगाम

31 Jul 2025 22:09:02

जसा घोड्यावर नियंत्रणासाठी लगाम कसला जातो, तशीच काहीशी नेत्यांवर लगाम कसण्याची वेळ राज्यातील काँग्रेसवरही ओढवल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत पुरती दाणादाण उडाल्यानंतर, आता उरलेसुरले नेतेही ‘हाता’तून निसटून जाऊ नये, म्हणूनच त्यांच्यावर ‘जम्बो कार्यकारिणी’चा हा नवा लगाम! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नुकतीच जवळपास ४०० जणांची भलीमोठी राज्य कार्यकारिणी घोषित केली.

या कार्यकारिणीत भौगोलिक आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसने केला. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला या प्रादेशिक समतोलाचे स्मरण झालेले दिसते. नानांनंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात नवीन प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडून सहा महिने लोटल्यानंतर काँग्रेसने ही ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर केली. म्हणजे एकूणच काय तर आता पक्षाकडे नेतेमंडळींना देण्यासारखे काहीएक उरलेले नाही. त्यामुळे पक्षातील संभाव्य पक्षांतराची त्सुनामी रोखण्यासाठीच उरल्यासुरल्या नेत्यांना वेगवेगळ्या पदांची लालसा दाखवून, काँग्रेसने हा कार्यकारिणीचा लगाम कसण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणता येईल.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात काँग्रेसची निवडणुकांमध्ये झालेली वाताहत, नेतृत्वशून्यता, हिंदूविरोधी भूमिका आणि तुष्टीकरणाचे राजकारण यामुळे हा पक्ष सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील विस्कटलेली पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू आहे. याचाच पहिला भाग म्हणून काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलून भाकरी फिरवली. मात्र, नव्या प्रदेशाध्यक्षांनाही पक्षगळती रोखण्यात अपयश आले. नुकतेच काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल आणि ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांनी काँग्रेसची साथ सोडली. एवढेच नाही तर मागे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपले दुकान बंद होण्याच्या आत काहीतरी रामबाण उपाय शोधण्यासाठीच जम्बो कार्यकारिणीचा घाट घातला गेला. या कार्यकारिणीत अनेक तरुणांना थेट सरचिटणीसपदी बसवून आधीच त्यांचा बंदोबस्त केल्याचे दिसते. त्यात आता ज्येष्ठांच्या लढाईत तरुणाई किती टिकाव धरते आणि काँग्रेस कार्यकारिणीचा हा लगाम प्रभावशाली ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे!

वर्षाताईंचा डाव नाकाम!

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू असताना विरोधकांनी पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या अपरिपक्वतेचेच दर्शन घडवले. सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे अक्षरश: काँग्रेसची पिसे काढत असताना, एका महिला खासदाराने त्यांना डिवचण्यासाठी अचानक ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणा दिली. यावरून श्रीकांत शिंदे यांनी त्या महिला खासदाराचा खरपूस समाचार घेतला. त्या महिला खासदार म्हणजे उत्तर मध्य मुंबईच्या वर्षाताई गायकवाड. श्रीकांत शिंदे यांनी कमीतकमी शब्दांत वर्षाताईंना त्या संसदेत बसल्या आहेत, याची जाणीव करुन दिली. श्रीकांत शिंदे म्हणाले की, "अरे आता तरी ‘मॅच्युअर’ व्हा, तुम्ही संसदेत आला आहात, आता महापालिकेत नाहीत!” त्यामुळे आपण पालिकेच्या सभागृहातील नगरसेवक नाही, तर आता संसदेतील खासदार आहोत, याची जाणीव श्रीकांत शिंदे यांनी वर्षाताईंना करुन दिली ते उत्तमच. कारण, संसदेच्या सभागृहात इतक्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना, अशा वायफळ घोषणा देऊन भाषण देणार्‍यांचे लक्ष मुद्दाम विचलित करायचे आणि कुठे तरी ‘हायकमांड’च्या ‘गूड बुक्स’मध्ये आपलीही कामगिरी (की चापलुसी) झळकाविण्याचा प्रयत्न करायचा, असा हा सगळा केविलवाणा प्रकार. मागे असेच खा. निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेवरुन वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पावसाळी अधिवेशनादरम्यान वर्षाताई, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी म्हणे दुबे यांना घेरले आणि जाब विचारला, अशा बातम्याही प्रसारित झाल्या.

वास्तविक, या तिन्ही महिला खासदारांचा आणि दुबे यांच्या भेटीचा फोटो पाहिल्यास त्यात ते तिघेही निवांत लॉबीमधून चालताना दिसतात. त्यानंतर मात्र निशिकांत दुबे यांनी काँग्रेस खासदारांची ही चाल त्यांच्यावरच उलटवली. ‘लॉबीमध्ये जे चालतं ते मजा मस्ती असते. त्याच्या बातम्या होऊ शकत नाही,’ अशा शब्दांत दुबेंनी भर सभागृहात वर्षाताईंचे नाव घेत त्यांचे पितळ उघडे पाडले. परंतु, काँग्रेसला मराठीचा इतका पुळका कधीपासून आणि कशासाठी, हा यानिमित्ताने पडलेला मोठा प्रश्न! असो. वर्षाताईंचे पक्षात कुणाशीही नसलेले सख्य कायम चर्चेत असतेच. आता नवे प्रदेशाध्यक्षसुद्धा फारसे विचारत नसल्याने ‘हायकमांड’ला खूश करण्यासाठीच ताईंचा हा सगळा खटाटोप. त्यामुळे आपण संसदेत ‘हायकमांड’साठी आहोत की जनसेवेसाठी, याचा विचार ताईंनी जरुर करावा!
Powered By Sangraha 9.0