समृद्ध हिंदू परंपरेचा संयुक्तिक सन्मान

31 Jul 2025 11:40:51

भारताच्या प्राचीन इतिहासातील सर्वाधिक प्रभावी आणि दूरदर्शी सम्राटांपैकी एक, राजेंद्र चोल पहिला यांच्या गौरवशाली परंपरेस वंदन करताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार रुपये मूल्याचे नाणे राष्ट्राप्रति समर्पित केले. हे नाणे म्हणजे निव्वळ चलन किंवा संग्रहणीय वस्तू नसून, ते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्मरण आहे. संपूर्ण देशाला विस्मृतीत गेलेल्या, तथापि जागतिक प्रभाव असणार्‍या चोल या हिंदू साम्राज्याचा गौरवशाली वारसा पुनरुज्जीवित करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक हजार रुपयांच्या विशेष स्मृतिनाण्याचे अनावरण करताना, चोल सम्राट राजेंद्र चोल प्रथम यांच्या गौरवशाली ऐतिहासिक वारशाला वंदन केले. तामिळनाडूमधील तंजावर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी चोल संस्कृतीचे सांस्कृतिक, धार्मिक आणि स्थापत्य परंपरेतील अनमोल अशा योगदानाचे स्मरण करून दिले. ते म्हणाले की, “भारतीय इतिहास हा केवळ गुलामीचा इतिहास नाही, तर तो चोलांसारख्या महान हिंदू साम्राज्यांचा गौरवशाली इतिहासही आहे.” त्यांचे हे विधान केवळ एका सम्राटाच्या स्मृतीपुरते मर्यादित नसून, त्यांनी आपल्या संसदेतील अलीकडील भाषणातही चोल, पल्लव, मौर्य, गुप्त, छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या हिंदू राजवटींचा मुख्यत्वाने उल्लेख करून, भारताच्या सुवर्णकाळाचे पुनरावलोकन करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. चोल राजांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने राजेंद्र चोल संग्रहालयदेखील स्थापन करण्याची घोषणा केली. भारताच्या इतिहासातील झाकोळलेल्या हिंदू साम्राज्याचा गौरवशाली इतिहास जागतिक व्यासपीठावर सादर करण्याचा त्यामागे उद्देश. आजही बरेचदा डाव्यांकडून चोल साम्राज्य हिंदू नव्हते, असा तद्दन खोटा प्रचार केला जातो. तथापि, चोल राजांची मंदिरनिष्ठता, त्यांच्या शिलालेखांतील संस्कृत-तामिळ श्लोक, बृहदेश्वर मंदिराचे अद्भुत शिल्पकौशल्य आणि सेंगोलच्या माध्यमातून धर्मशाहीवर आधारित राजधर्म यावरून त्यांच्या हिंदू अस्मितेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

चोल हे केवळ दक्षिणेकडील साम्राज्य नव्हते, तर राजेंद्र चोल प्रथम यांनी या साम्राज्याची सीमा गंगेपारपर्यंत तर दाक्षिणात्य समुद्रकिनार्‍यापासून बाली, सुमात्रा, मलेशियापर्यंत विस्तारली होती. चोल साम्राज्याचे नौदल इतके सक्षम होते की, त्यांनी दक्षिण आशियामध्ये व्यापार, धर्म आणि कलासंस्कृतीचा सर्वत्र प्रसार केला. त्यामुळे चोल हे हिंदू साम्राज्यच होते आणि त्यांनी शैव-संप्रदायाचा विशेष पगडा आपल्या स्थापत्य व नित्यधार्मिक जीवनात ठसवला होता.

चोल राजांची सर्वांत मोठी देणगी म्हणजे, त्यांनी उभारलेली भव्य मंदिरसंस्था. बृहदेश्वर मंदिर हे आजही जागतिक दर्जाचे स्थापत्य मानले जाते. यातल्या भव्य गोपुरा, नक्षीकाम आणि शिल्पयोजना केवळ धार्मिक नव्हे, तर तांत्रिक दृष्टिकोनातूनही अद्वितीय आहेत. मिनाक्षीपूरम, दारासुरम, गंगैकोंड चोलपूरम ही मंदिरांची शृंखला म्हणजे चोल स्थापत्यशैलीच्या उत्कर्षाची जिवंत साक्ष. या मंदिरांच्या माध्यमातून चोल साम्राज्याने धर्म, समाजकारण आणि प्रशासन यांचा त्रिवेणी संगम साधला होता. ‘सेंगोल’सारख्या प्रतीकांतून राजा धर्माच्या अधीन राहावा, अशी संकल्पनाही रूढ केली गेली. यामुळे राजसत्ता ही नेहमीच न्याय, सेवा आणि धर्मपालनाच्या चौकटीत कार्यरत राहिली. चोल साम्राज्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, त्यांची कृषी आणि जलव्यवस्थापन प्रणाली. त्यांनी जलाशय, तलाव आणि कालवे बांधून शेतीला सक्षम केले. यामध्ये स्थानिक ग्रामसभा, महसूल संकलनाची पारदर्शक यंत्रणा, तसेच ग्रामस्तरावरील स्वराज्यात्मक व्यवस्थांचा उपयोग करण्यात आला होता. म्हणून आजही चोल प्रशासन हे आधुनिक व्यवस्थापनासाठी एक आदर्श वस्तुपाठच ठरावा.

चोल साम्राज्याने व्यापार, संस्कृती आणि कलेच्या माध्यमातूनही जागतिक स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांच्या शिलालेखांमध्ये समुद्रापार नेमून दिलेले राजदूत, शैव व बौद्ध मंदिरांना मदतीचे उल्लेख, हे त्यांच्या उदात्ततेचे प्रतीक ठरतात. भारतासारख्या देशाला ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना जागतिक पातळीवर अधोरेखित करायची असल्यास, चोलांच्या परराष्ट्र नीतीकडे पाहणे आवश्यक ठरते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाणे अनावरण करताना म्हटले आहे की, “राजा राजेंद्र चोल आजही तामिळ अस्मितेचे आणि भारतीय सांस्कृतिक शक्तीचे प्रतीक आहेत.” त्यांचे हे वक्तव्य राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक पुनरुत्थानाचे घोषणापत्र आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. कारण, यापूर्वीही मोदी सरकारने राम मंदिर उभारणी, काशी-विश्वनाथ कॉरिडोर, संसदेत सेंगोलची प्रतिष्ठापना यांसारख्या प्रत्यक्ष कृतीतून भारतीय परंपरेचे जतन व सन्मान केला आहे. हे नाणेही त्याच शृंखलेतील एक महत्त्वाचा भाग.

स्वातंत्र्यानंतर कित्येक दशकांपर्यंत भारतात ‘राष्ट्रीय इतिहास’ म्हटले की, तो उत्तरेतील साम्राज्यांपुरता मर्यादित राहिला. मौर्य, गुप्त, मुघल यांच्या प्रभावाचीच चर्चा झाली. मात्र, दक्षिण भारताच्या प्रबळ हिंदू राजवटीचा कोणीही उल्लेख केला नाही. चोल, पल्लव, पांड्य हे केवळ स्थानिक पातळीवरच चर्चेत राहिले. या पार्श्वभूमीवर या नाण्याचे अनावरण हे दक्षिण भारताच्या राष्ट्रनिर्मितीतील ऐतिहासिक योगदानाचा स्वीकार करणे ठरते. भारताच्या इतिहासाचे भारतीयीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. दिल्ली किंवा पाटलीपुत्र नव्हे, तर तंजावरपासून चोलगंगेपर्यंतचा इतिहास हा राष्ट्रीय इतिहास आहे, याची मान्यता यातून मिळते. या नाण्याच्या अनावरणाद्वारे भारताने केवळ एका सम्राटास नव्हे, तर हिंदू परंपरेला, दक्षिणेकडील सांस्कृतिक वैभवाला आणि विस्मृतीत गेलेल्या सामर्थ्याला मानाचा मुजरा केला आहे. हे नाणे तामिळ जनतेसाठी एक सन्मानाचा क्षण असला, तरी त्याचबरोबर हा संपूर्ण देशासाठीही तितकाच गौरवास्पद क्षण. भारताचा खरा इतिहास संकुचित किंवा विभागलेला नाही, तर तो व्यापक, वैश्विक आणि समन्वयी आहे, हे केंद्र सरकारने यानिमित्ताने नेमकेपणाने अधोरेखित केले आहे.

राजेंद्र चोलांसारखा सम्राट, ज्याच्या नौदलाने सीमापल्याड हिंदू सामर्थ्याचा झेंडा फडकावला, ज्याच्या कारभाराने लोकशाहीसदृश संस्था निर्माण केल्या आणि ज्याच्या स्थापत्यकलेने जग विस्मयचकित झाले, अशा व्यक्तिमत्त्वास आजच्या भारताने आदरांजली वाहिली, हे नक्कीच स्वागतार्ह आणि प्रेरणादायी असेच! म्हणूनच, हे नाणे फक्त स्मरणचिन्ह नव्हे, तर भारतीयत्वाच्या जागृतीचे प्रतीक आहे. खरं तर याचे मूल्य एक हजार रुपयांपेक्षा कित्येक पटींनी अधिकच. सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रीय आत्मसन्मानाच्या दृष्टीने तर ते अनमोल असेच. जागतिक दर्जाची स्थापत्यशैली, न्यायनिष्ठ प्रशासन आणि समुद्रापलीकडील आपला प्रभाव निर्माण करणारे चोल हे भारतातील कल्याणकारी हिंदू साम्राज्याचे आदर्श उदाहरण. त्यांच्या सन्मानासाठी उचित पावले उचलली जात असतील, तर त्याचे स्वागत हे झालेच पाहिजे!
Powered By Sangraha 9.0