आंतरराष्ट्रीय राजकारणातील मैत्रीला अनेक कंगोरे असतात. ती कधीही स्थायी नसते आणि टिकाऊ तर त्याहूनही नसते. जसे वारे वाहतील, तशी ही मैत्री. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये अमेरिका जो रस दाखवत आहे, त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण आहे की, पाकिस्तानमधल्या चीनच्या अस्तित्वाला धक्का द्यायचा. दुसरीकडे भारताला रशियाशी मैत्री करण्यापासून विचलित करायचे. पण, अमेरिका हेसुद्धा जाणून आहे की, आजचा भारत हा स्वयंसिद्ध भारत आहे. जो भारत कुणाला दबत नाही आणि कुणाला दाबतही नाही.
भारताचे, त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आहोत, असे भासवणारे ट्रम्प हे सध्या पाकिस्तानचे जास्तच लाड करताना दिसतात. यामागे कारण काय असावे, याचा मागोवा घेताना जाणवते ते ट्रम्प यांना शांततेच्या ‘नोबेल’ पारितोषिकाचे सध्या वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांना जागतिक महासत्तेचा महासत्ताधिकारी नेता म्हणून स्वतःला स्थापित करायचे आहे. पण, सध्या ट्रम्प यांचे नक्षत्र खराब आहेत, असेच म्हणावे लागेल. पूर्वी जसे अमेरिका दोन देशांच्या युद्धात कुणा एका देशाची बाजू घेऊन स्वतःला जगाचा बादशहा आहोत, असे भासवायचा ते तसे आता करता येणार नाही. कारण, जगभरात या ना त्या देशाचे युद्ध सुरूच आहे. त्यामुळे कोणत्या देशाला समर्थन करायचे आणि कुणाच्या विरोधात उतरायचे, हा पेच अमेरिकेला पर्यायाने ट्रम्प यांना पडला आहे. रशिया-युक्रेन युद्धात अर्थातच अमेरिका रशियाचा समर्थक नव्हताच. पण, त्यामुळे युक्रेनला काही फायदा झाला असेही नाही. उलट युद्ध लांबत राहिले. भारत-पाकिस्तानचेही युद्ध झाले. या युद्धात भारताने निर्विवाद विजय मिळवला. त्यावेळी ट्रम्प यांनी आपण मध्यस्थी केली, म्हणून युद्ध थांबले असे ट्रम्प म्हणू लागले. पण, अगा जे घडलेच नाही असेच त्याचे स्वरूप होते. आशिया खंडातील दोन देशांमधील युद्धाला आपण थांबवू शकतो, असा त्यांचा तो दावा होता. मात्र, भारताने हा दावा खोडून काढला. त्यामुळे ट्रम्प यांचा खोटारडेपणा उघड झाला. दुसरीकडे प्रत्यक्ष अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी यादवी माजली. गाझा समर्थकांनी अमेरिकेच्या कायदा-सुव्यवस्थेची एैशीतैशी केली, ती ट्रम्प यांच्या सत्ताकाळातच. त्यातच अमेरिकेच्या श्वेत आणि अश्वेतांचा संघर्ष काही संपत नाही. त्यातच ट्रम्प यांनी श्वेतांचे समर्थन करणार्या काही कृतीही केल्या. त्याचवेळी अमेरिकेत असलेल्या जगभरातील नागरिकांना अमेरिकेबाहेर काढले. हे सगळे सुरू असताना दुसर्या देशांनी अमेरिकेचे वर्चस्व स्वीकारावे, म्हणून ट्रम्प यांनी दबावतंत्र वापरले. या सगळ्याचा परिणाम ट्रम्प यांच्या लोकप्रियतेवर झालाच. ट्रम्प यांचे कधीकाळी प्रिय असलेले एलॉन मस्क आता ट्रम्पचे मित्रदेखील राहिलेले नाहीत. थोडक्यात, काय तर ट्रम्प हे राष्ट्रपतिपदाची ती अस्मिता सांभाळू शकले नाहीत. अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पत निर्माण व्हावी, म्हणून ट्रम्प काहीही करत आहेत.
मात्र, याच पार्श्वभूमीवर रशिया आता पुन्हा जागतिक स्तरावर चर्चेत आहे. रशियाने भारत आणि चीनला स्वस्तात तेल विकण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक फायद्याच्या दृष्टीने भारतानेही हा प्रस्ताव स्वीकारला. व्यापार सुरूही झाला. रशिया आणि भारताचे हे संबंध ट्रम्प यांना आवडणारे नव्हतेच. त्यामुळे मग अमेरिकेने पाकिस्तानशी जवळीक करण्याची सुरुवात केली. त्यातच नुकतेच परराष्ट्रमंत्री जयशंकर चीनच्या दौर्यावर असताना चीनने प्रस्ताव दिला की, "रशिया, भारत आणि चीन म्हणजे ‘आरआयसी’ हा मंच पुन्हा मजबूत करायला हवा.” यावर जयशंकर यांनी म्हटले बघूया. पण, जयशंकर यांच्या या विधानानेही अमेरिकेला घाम फुटला. न जाणो ‘आरआयसी’ मंच पुन्हा उभे राहिले तर? ९०च्या दशकामध्ये अमेरिकेच्या दादागिरीवर अंकुश ठेवण्यासाठी रशियाचे पूर्व पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव यांनी ‘आरआयसी’साठी पुढाकार घेतला होता. मात्र, २०२० सालच्या गलवानच्या संघर्षानंतर हा मंच निष्क्रिय झाला. रशिया, भारत, चीन पुन्हा एका मंचावर नकोत, या विचाराने ट्रम्प भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारत विचलित होणार नाही. अमेरिकेला चांगले वाटावे म्हणून ट्रम्प यांच्या इशार्यावर पाकिस्तान नाचेल; पण भारत फक्त भारताच्या विकासाचाच विचार करणार!