मुंबई : राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या.
समितिच्या प्रत्येक सेविकेला त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असे. सतत प्रवास करणाऱ्या, महिला कार्यकर्त्यांना अध्ययनाच्या दृष्टीकोनातून प्रेरणा देणाऱ्या एक विचारवंत, प्रेमळ आणि तेजस्वी असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. नुकत्याच जुलै २०२५ दरम्यान झालेल्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी बैठकीत "सर्वे भवन्तु सुखिनः, सतर्क रहें सजग रहें, सतत कार्यरत रहें।" हा संदेश त्यांनी समितिच्या कार्यकर्त्यांना दिला होता.