काँग्रेसचे ‘हिंदू दहशतवादा’चे कुभांड न्यायालयाने उध्वस्त केले – रविशंकर प्रसाद यांचा घणाघात , सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

31 Jul 2025 18:31:40

नवी दिल्ली :  काँग्रेसने रचलेले ‘हिंदू दहशतवाद’ हे कुभांड अखेर न्यायालयाने उध्वस्त केले आहे. देशातील हिंदूंना लक्ष्य केल्याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, असा घणाघात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केली आहे.

एनआयए विशेष न्यायालयाने २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, काँग्रेसने साधू-संत, देशासाठी लढणारे सैनिक, आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक यांना लक्ष्य केले. कर्नल पुरोहित यांना अडकवले, ज्यांनी काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात लढा दिला होता. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अमानुष छळ सहन करावा लागला. केवळ त्यांच्याविरोधात एवढेच पुरावे असल्याचे सांगण्यात आले की स्फोटात वापरलेली मोटरसायकल त्यांच्या नावावर होती. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला होता. ही केवळ पोलिसी कारवाई नव्हती, हा पूर्ण विचारधारेवर केलेला हल्ला होता, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले.

रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर थेट आरोप करत म्हटले की, राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी आता देशाची आणि संतसमुदायाची जाहीर माफी मागावी. भगवा दहशतवाद ही थिअरी काँग्रेसच्या लांगुलचालनाच्या राजकारणातून जन्माला आली होती. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत 'भगवा दहशतवाद' हा शब्द वापरला आणि त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी संसदेत त्यास दुजोरा दिला. होता. हिंदू समाजाला संशयाच्या छायेत आणून लांगुलचालनाच राजकारण साधण्याचा हा कुटील डाव होता. राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि भगवा हे या देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक आहेत. त्या दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय आणि नैतिक दिवाळखोरीचे वस्तुपाठ म्हणून हे प्रकरण ओळखले जाईल, असाही टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.
Powered By Sangraha 9.0