'हिंदू दहशतवादी' या बोगस काँग्रेसी थिअरीला न्यायालयाची चपराक! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी इतिहासच काढला

31 Jul 2025 17:56:28

मुंबई(Malegaon blast and Congress politics of appeasement): २००८ च्या मालेगाव स्फोटांनंतर भारतात पहिल्यांदाच ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘भगवा दहशतवाद’ ही काँग्रेस निर्मित थिअरी चर्चेत आली. या थिअरीच्या केंद्रस्थानी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर(रा.स्व.संघ) बॉम्ब बनवण्याचे कारखाने चालवण्याचा आरोप केला होता आणि संघाला मालेगाव, अजमेर शरीफ, व समझोता एक्सप्रेससारख्या हल्ल्यांशी जोडले होते.

२०१० मध्ये, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘भगवा दहशतवाद’ ही संज्ञा अधिकृतपणे वापरली. पुढे २०१३ मध्ये, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जयपूरमधील काँग्रेस परिषदेत रा.स्व.संघ आणि भाजप दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवत असल्याचा आरोप केला होता, या वक्तव्यांमुळे देशभरात तीव्र राजकीय वादंग उसळले होते. २००९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूत टिमोथी रोमर यांच्याशी बोलताना, ‘कट्टरपंथी हिंदू गट’ हे इस्लामी दहशतवादी संघटनांपेक्षा अधिक धोकादायक आहेत असे ते म्हटले होते.

मुंबईच्या विशेष न्यायालयाने गुरूवार दि. ३१ जुलै रोजी सातही आरोपी निर्दोष मुक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत म्हटले की, “मला अभिमानाने सांगायचे आहे की, कोणताही हिंदू कधीही दहशतवादी असू शकत नाही. काँग्रेसने त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा भाग म्हणून भगवा दहशतवाद ही संकल्पना वाढवली आहे. त्यांनी मतांसाठी दहशतवादाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतातील लोकांनी हा त्यांचा खोटेपणा नाकारला आहे.” अशाप्रकारे शाह यांनी काँग्रेसच्या हिंदू द्वेष नीतीवर प्रहार केला.

मालेगाव स्फोट प्रकरण हा केवळ एक गंभीर हल्ला नव्हता, तर त्यावरून काँग्रेसने निर्माण केलेली हिंदू दहशतवाद ही संकल्पना हिंदू द्वेषाचे कारण बनली. भारतीय राजकारणात आणि समाजशास्त्रात वामपंथी विचारधारेसाठी हिंदू दहशतवाद ही संकल्पना हिंदूचे खचीकरण करणारी एक दोरी बनली. आज, या न्यायालयीन निकालानंतर ही संकल्पना आणि तिच्या वापराच्या हेतूंवर लगाम लागला.




Powered By Sangraha 9.0