नवी दिल्ली: खासदार शशी थरूर यांनी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या २५ टक्के अतिरिक्त कर पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे दरम्यान, संसद भवनाबाहेर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने हा कर अश्यावेळी लावला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये कारवाई व्यापारसंबधातील चर्चा अजूनही सुरू आहे, अमेरिकेने अचानक लादेलेल्या २५ टक्के कराने दोन्ही देशांमधील व्यापार संवादातील वातावरण बिघडू शकते.
थरूर म्हणाले की, “ करासंबंधी झालेल्या चर्चेत भारताने निश्चितच काही सकारत्मकता दाखवावी, परंतु अमेरिकेच्या कोणत्याही दबावाखाली भारताच्या राष्ट्रीय हितांशी तडजोड करू नये, भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी साधने खरेदी केल्याने भारताला दंड म्हणून देण्यात आलेला ट्रम्प यांचा हा एक राजनैतिक निर्णय असू शकतो.” असे थरूर म्हणाले.
अमेरिकेने अचानक लादलेल्या या कराने भारतातून होणारी निर्यात आणि भारताच्या जीडीपीला धोका होऊ शकतो. कारण भारत दरवर्षी अमेरिकेला सुमारे ८७-९० अब्ज डॉलर्सची निर्यात करतो. जर का यात मोठी घट भविष्यात झाली तर थरूर यांच्या मते, भारत जीडीपीच्या सुमारे अर्धा टक्का गमवू शकतो व भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो.
भारतात शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य
दरम्यान, थरूर यांनी भारतीय शेतकऱ्यांचा प्राधान्य देत म्हणाले की, “भारतातील सुमारे ७० कोटी लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि अमेरिकेच्या व्यापारी दबावामुळे शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आणता येणार नाही, अमेरिकेला खूश करण्यासाठी भारत शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आणू शकत नाही.”
थरूर यांनी असेही म्हटले की, “अमेरिकेच्या या कर धोरणाचा परिणाम केवळ भारतावरच नाही तर जगभरातील अनेक देशांवर होत आहे.” ट्रम्प यांनी यापूर्वी ब्रिक्स देशांनी डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्या देशांवर १००% कर लादण्याचे संतापजनक वक्तव्य केले होते.