हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही मंत्री नितेश राणे ; आतंकवादाचा आणि जिहादचा रंग हिरवाच

31 Jul 2025 18:13:07

मुंबई : हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही. आतंकवादाचा आणि जिहादचा रंग हिरवाच आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी दिली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "आम्ही वारंवार हिंदूत्ववादी कार्यकर्ते म्हणून स्पष्ट बोलतो की, हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही. आजच्या निकालाने ते परत एकदा स्पष्ट झाले आहे. हिंदू समाजाचा व्यक्ती कधीही कुठल्या अन्य धर्माचा द्वेष करून स्वत:चा धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. जगाच्या पाठीवर असे कुठलेही उदाहरण मिळणार नाही आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मालेगाव प्रकरणाच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद म्हणून हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तोंड काळे झाले असेल. त्यांना चेहऱ्या दाखवण्यासाठी जागा नसेल," अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, "कधीही कुठलाही हिंदू धर्मांतरण करून आपला धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करत नाही, दुसऱ्या धार्मिक स्थळाला तोडून अतिक्रमण करून मंदीर बनवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे मालेगाव खटल्याच्या निमित्ताने हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता. यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीची अशी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये. यातून आतंकवादाचा आणि जिहादचा रंग हिरवाच आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या कालावधीत हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केस टाकून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रात आणि राज्यात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असताना आता ते शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रात हिंदू सुरक्षित आहे यावर परत एकदा शिक्कामोर्तब झाले आहे."

'त्या' नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी

ज्या नेत्यांनी हिंदूंची बदनामी केली त्यांनी हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे. मंदिरात जाऊन नतमस्तक झाले पाहिजे. हिंदूंनीच हिंदू समाजाची बदनामी करावी हे आमचे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी. त्यांनी न्यायालयात सादर केलेले कुठलेही पुरावे ते सिद्ध करू शकले नाहीत. हिंदूंचा द्वेष करून त्यांची बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून सुरु होता. आतंकवादाला, जिहादला ताकद देणे सुरु असल्याचे आता स्पष्ट झाले."

पाकिस्तान आणि काँग्रेसची भाषा एकच

"त्यावेळीच्या काँग्रेस सरकारला हिंदू द्वेषच करायचा होता. मुस्लीम लीगची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते. पाकिस्तान आणि काँग्रेसची भाषाही एकच असते. आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी जे जे षडयंत्र करणारे आणि गजवा ए हिंद करणाऱ्या लोकांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेसचे लोक बोलत आले आहेत. त्यामुळे भगवा दहशतवाद खरंच होता का याविषयी ते पुरावेच देऊ शकले नाहीत. कोणताही हिंदू आपल्या धर्मासाठी कुठल्याही दुसऱ्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही. लव्ह जिहाद आणि लँड जिहादचे विष पेरणाऱ्यांनी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकायला हवे," असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.
Powered By Sangraha 9.0