मोदींनी काँग्रेसला सीमेवर लढाईकरिता पाठवल्यास सैनिक काय करतात समजेल: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका

31 Jul 2025 18:45:11

डोंबिवली : पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व विरोधकांना सीमेवर लढाईकरिता नेले पाहिजे म्हणजे त्यांना सीमेवर सैनिक कसे लढतात हे समजेल, असे मत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

'ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव' ने पाकिस्तानमधील आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. संसदेत काँग्रेस खासदार व इतर पक्षातील खासदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत चित्रा वाघ बोलत होत्या. डोंबिवलीतीत डोंबिवली जिमखाना येथे भारतीय जनता पार्टी महिला कार्यकर्त्या संवाद मेळाव्यात नेत्या चित्रा वाघ या मार्गदर्शन करण्याकरता आल्या होत्या. यावेळी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे , कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर , पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रिया जोशी , ग्रामीण मंडळ अध्यक्ष कर्ण जाधव , धनाजी पाटील , कल्याण मंडळ अध्यक्ष नितेश म्हात्रे , संतोष शेलार, योगेद्र भोईर, रेखा चौधरी, रिया शर्मा, वैशाली पाटील, प्रीती दीक्षित आदी उपस्थित होते.

चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, ज्या आतंकवादयानी भारत देशातील 26 महिलांचे कुंकू पुसले त्या आतंकवाद्यांना भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव' ने कंठस्नान घातले. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैनिकांचे सर्व देशवासियांनी आभार मानले. जगातील सर्व देश आपल्या देशाबरोबर असतानाही काँग्रेसने प्रत्येक वेळेला सरकारवर अविश्वास दाखवला.काँग्रेसने देशातील सैनिकांवर अविश्वास दाखवला हे अत्यंत निंदाजनक आणि संतापजनक आहे.काँग्रेसचा निषेध करावा तेवढा कमी आहे.आपले सैनिक सीमेवर आहेत म्हणून देशातील नागरिक सुरक्षित आहेत.पंतप्रधान मोदींनी विरोधकांना एका गाडीत बसवून सीमेवर लढाईसाठी पाठवले पाहिजे तेव्हा त्याच्या लक्षात येईल की आपले सैनिक आपल्यासाठी काय करत आहेत.सैनिकांबद्दलचा अपमान हा कदापि खपवून घेतला जाणार नाही. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे ज्या प्रमाणे संसदेत याला तमाशा म्हणाल्या आहेत,त्यांची अक्कल ठिकाण्यावर आहे का असे विचारण्याची वेळ आली आहे.आज ज्या पद्धतीने मोदींनी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर आम्ही घुसून मारू हे दाखवून दिले आहे. भारतीय सैनिकांबद्दल प्रत्येकाला अभिमान आहे.जर त्याच्या बद्दल अविश्वास दाखविला तर तो कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.


Powered By Sangraha 9.0