दीड किलो वजनाच्या बुरशीसह पाच बुरशींची महाराष्ट्रात प्रथमच नोंद; कोल्हापुरातील संशोधन

31 Jul 2025 20:18:37

species of fungus

मुंबई (अक्षय मांडवकर) - पावसाळ्यात जमीन किंवा झाडांमधून डोक वर काढणाऱ्या बुरशीच्या पाच प्रजाती महाराष्ट्रामधून प्रथम नोंदविण्यात आल्या आहेत (species of fungus). बुरशीच्या ॲगॅरीकेल्स वर्गातील या पाच प्रजातींचा समावेश होत असून त्यामधील चार प्रजाती या खाण्यास योग्य, तर एक प्रजात विषारी आहे (species of fungus). महत्त्वाचे म्हणजे त्यामधील एक प्रजातीचे वजन हे दीड किलोपर्यंत भरत असून या सर्व प्रजातींची नोंद कोल्हापूर जिल्ह्यातून करण्यात आली आहे. 
(species of fungus)
 
पावसाळ्यात उगवणाऱ्या अनेक बुरशी या दुर्लक्षित आहेत. त्यांच्यावर फार मोजकेच संशोधक काम करत आहेत. बुरशीमधील ॲगॅरीकेल्स नामक वर्गातील बुरशी या अशाच दुर्लक्षित असल्याने कोल्हापुरच्या राजाराम महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली पाटील आणि रिसर्च स्काॅलर सुशांत बोरनाक यांनी या बुरशींवर अभ्यास केला. या अभ्यासामधून त्यांनी ॲगॅरीकेल्स गटामध्ये समाविष्ट असलेल्या १० प्रजातींची नोंद केली असून त्यामधील पाच प्रजातींची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. यासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाचे वृत्त ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.


species of fungus 
 
ॲगॅरीकेल्स या वर्गातून अ‍ॅग्रोसायब पेडियाड्स, अमानिता मॅनिकाटा, बोलबिटियस कोप्रोफिलस, एन्टोलोमा सेरुलाटम, एन्टोलोमा थेक्षनागंधम, हायमेनोपेलिस रेडिकाटा, मॅक्रोसाईब गाईगॅनशीया, स्किझोफिलम कम्यून, टर्मिटोमायसेस हेमी, टर्मिटोमायसेस मायक्रोकार्पस या दहा प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. अमानिता मॅनिकाटा, बोलबिटियस कोप्रोफिलस, एन्टोलोमा सेरुलाटम, एन्टोलोमा थेक्षनागंधम, मॅक्रोसाईब गाईगॅनशीया या प्रजातींची महाराष्ट्रामधून प्रथमच नोंद करण्यात आली आहे. यामधील एन्टोलोमा सेरुलाटम ही प्रजात मानवासाठी विषारी असून इतर चार प्रजाती या खाण्यायोग्य आहेत.

खाण्यायोग्य प्रजाती
मॅक्रोसाईब गाईगॅनशीया ही आकाराने मोठी प्रजात असून तिचे वजन साधारण दीड किलोपर्यंत भरते. ही प्रजात भारतामध्ये खाण्यासाठी वापरली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या जंगली अळंबींमध्ये टर्मिटोमायसेस आणि प्ल्युरोटस या प्रजातींचा समावेश असतो. टर्मिटोमायसेस ही प्रजाती सामान्यतः जंगली प्रदेशात आणि शेतीच्या जवळ आढळतात. बहुतेक वेळा ती वाळवीच्या वारुळातून उगवते म्हणूनच तिला टर्मिटोमायसेस म्हटले जाते. या व्यतिरिक्त पेडियाड्स, रेडिकोटा, हेमी आणि मायक्रोकार्पस या प्रजाती त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखल्या जातात. या बुरशींमध्ये अँटी मायक्रोबियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीकॅन्सर गुणधर्म असतात.

 

Powered By Sangraha 9.0