मुंबई : हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभे करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला असून आता काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागायला हवी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवले. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसने जाणीवपूर्वक 'हिंदू दहशतवाद' हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतके मानवतेचे आणि सहिष्णुतेचे प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभे करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला."
हिंदू कधीच दहशतवादी नव्हता
"आज कोर्टाने सत्य मांडले, आता काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागायला हवी. हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.