गणेश मंडळांना मोठा दिलासा: मंडपासाठी खड्डा खणल्यावर आता फक्त २ हजार रुपये शुल्क

31 Jul 2025 19:27:09

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी खड्डा खणल्यास बृहन्मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या १५ हजार रुपये दंडाच्या निर्णयाचा अखेर पुनर्विचार होणार आहे. या मागणीसंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे पूर्वीप्रमाणे केवळ २ हजार रुपये शुल्कच आकारले जाणार असून, हजारो गणेश मंडळांना याचा थेट लाभ होणार आहे.

गणेश उत्सव मंडळांसाठी हा दिलासादायक निर्णय असून, त्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भूमिका निर्णायक ठरली. ३० जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालयात आयोजित 'राजा छत्रपती समस्या समाधान शिबिर' प्रसंगी विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंडळांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मंत्री लोढा यांनी दंडाच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि तो प्रत्येकाला जल्लोषात साजरा करता यावा यासाठी सरकार तत्पर आहे. लवकरच आयुक्तांची भेट घेऊन यावर तोडगा काढू” असे आश्वासन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिबिरात दिले होते. सदर आश्वासन महायुती सरकारद्वारे आज पूर्ण करण्यात आले असून, यामुळे मुंबईतील हजारो सार्वजनिक गणेश मंडळांना लाभ होणार आहे.


Powered By Sangraha 9.0