महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला ६२ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती

31 Jul 2025 19:45:24

मुंबई: महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला महसूल व वन विभागाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण ६२ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार (राजपत्रित, गट-ब) पदावर पदोन्नती जाहीर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय सेवेत कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

नाशिक विभागात मंडळ अधिकारी संवर्गातील २१ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया २०२४-२५ या निवडसूची वर्षासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने पूर्ण झाली असून, खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात सहायक महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संवर्गातील ४१ कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यापैकी काहींना नियमित पदोन्नती कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर, तर काहींना सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, “महसूल दिनाच्या निमित्ताने ही पदोन्नती जाहीर करताना आनंद होत आहे. या अधिकाऱ्यांच्या नव्या जबाबदाऱ्या प्रशासनाला अधिक सक्षम करतील आणि जनतेच्या सेवेत त्यांचे योगदान मोलाचे ठरेल.” त्यांनी नवपदोन्नत अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी प्रोत्साहन दिले. या पदोन्नत्यांमुळे महसूल विभागातील मनुष्यबळाची गरज पूर्ण होण्यास मदत होणार असून, प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम बनणार आहे. या निर्णयामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


Powered By Sangraha 9.0