मॉस्को : (Tsunami Hits Russia after Strong Earthquake) रशियाच्या कामचात्का द्वीपकल्पाच्या किनारपट्टीवर बुधवारी जुलैला सकाळी ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणा (USGS) नुसार, त्याचे केंद्र जमिनीपासून १९.३ किलोमीटर खोलीवर होते. भारतीय वेळेनुसार पहाटे ४:५४ वाजता हा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली असून, किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. दरम्यान, त्सुनामीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या अनेक इमारती पाण्यात बुडालेल्या दिसत आहेत.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भूकंपानंतर कामचात्काच्या किनारी भागात सुमारे ४ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा उठल्या. या भूकंपामुळे अनेक इमारती आणि घरांचे नुकसान झाले आहे. एका बालवाडी शाळेचेही नुकसान झाले आहे. काही घरांचे छप्पर कोसळले, ज्यामुळे लोकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरम्यान, त्सुनामीच्या इशा-यानंतर रशियाच्या पूर्वेकडील प्रांताच्या गव्हर्नरांनी नागरिकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते.
त्सुनामीपूर्वीचा हा भूकंप अंदाजे १९ किलोमीटर खोलवर झाला होता आणि पेत्रोपावलोव्हस्क-कामचात्स्की शहराच्या ईशान्येकडील सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर त्याचे केंद्र होते. भूकंपानंतरची परिस्थिती पाहता, जपान, अमेरिका, चीनसह अनेक देशांच्या किनारी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू केले आहे.