श्लोक क्रमांक ६
हम्सैरप्यतिलोभनीयगमने हारावलीमुज्ज्वलां
हिन्दोलद्युतिहीरपुरिततरे हेमाङ्गदे कङ्कणे|
मञ्चीरौ मणिकुण्डले मकुटमप्यर्धेन्दुचूडामणिं
नासामोक्तिकमङ्गुलीयकटकौ काञ्चीमपि स्वीकुरु॥या श्लोकापासून पंचदशी मंत्रातील दुसरा विभाग, मध्यकूट अर्थात ‘कामराज कूट’ सुरू होत आहे. या कुटातील बीजाक्षरे ह, स, क, ह, ल, ह्रीं अशी आहेत. हे कूट इच्छाशक्तीचे प्रकटीकरण आहे. या श्लोकात श्री ललिता देवीची चाल आणि हंसांचे डौलदार चालण्याची तुलना केली आहे. श्री ललिता सहस्त्रनामात याच अर्थाचेही एक नाम आहे.
नाम क्रमांक ४७ : मराली मंद गमनाशब्दार्थ : ज्यावेळी चिदग्नी कुंडातून देवी प्रकट होते आणि इतर देवी-देवतांच्या दिशेने चालायला लागते, त्यावेळी तिच्या चालीचे हे केलेले वर्णन आहे. तिचे चालणे अत्यंत लयबद्ध, डौलदार, मंद वेग असलेले आणि मंत्रमुग्ध करणारे आहे. तिच्या या मोहक चालीचे अनुकरण राजहंस करतात आणि ती चाल ते शिकून घेतात. मादी राजहंसाची चाल सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने सर्वोत्तम मानली जाते. जिची चाल मोहक असेल, अशा सुंदर स्त्रीला ‘हंसगामिनी’ असे म्हणतात. परंतु हंसिणी डौलदार चालत असली, तरी ती मंदगामिनी नसते. डौलदार चाल हे अत्यंत कमनीय बांध्याचे प्रतीकसुद्धा असते. मंद चाल ही मदमत्त हत्तीणीची असते, जी तिच्या सामर्थ्याचे प्रतीक असते. श्री ललिताम्बिका ही स्वतः सौंदर्याचा परिपूर्ण मापदंड आहे. त्यामुळे तिच्या चालण्यात राजहंसाचा डौल आणि हत्तीणीचे सामर्थ्य हे दोन्ही एकाचवेळेला जाणवते.
श्री ललितात्रिपुरसुंदरीच्या मागेपुढे राजहंस फिरत असतात आणि तिच्या डौलदार चालीचे निरीक्षण करून, अनुकरणही करतात. आपण सिद्ध पुरुषाला ‘परमहंस’ अशी उपाधी देतो. अर्थात, सिद्ध पुरुष पूर्णत्वाला पोहोचले की, ते हंसस्वरूप होऊन श्री ललितादेवीचे सान्निध्य प्राप्त करू शकतात.
मानसपूजेच्या या टप्प्यावर, आचार्य देवीसाठी आणलेल्या विविध आभूषणे आणि अलंकारांची माहिती देत आहेत. या सौंदर्याच्या विलक्षण मोहात बद्ध आचार्य, आता मनोमनी तिला अलंकार अर्पण करत आहेत. सर्वप्रथम आचार्य उत्तम पाणीदार मोत्याचा कंठा अर्पण करतात. त्यानंतर आचार्य कोहिनूर समान तेजस्वी रत्नांनी भूषवलेली बाहुभूषणे, अर्थात वाकी आणि कंकणे अर्पण करत आहेत. तिच्या बाजूबंदात अत्यंत तेजस्वी हिरे जडवलेले आहेत आणि देवीच्या मुखकमलावरील तेज, या हिर्यांवर पडल्याने ते लकाकत आहेत.
देवीच्या कर्णांची शोभा वाढवण्यासाठी, आचार्यांनी रत्नखचित कुंडले आणली आहेत. तिच्या मस्तकाची शोभा वाढवणारा रत्नजडित मुकुटही आचार्य अर्पण करतात. हा मुकुट इतका नेमका बनवला आहे की, त्यामुळे देवीच्या कपर्दिनी स्वरूपाला अर्थात रमणीय केशसंभाराला कोणतीही बाधा पोहोचत नाही. अर्थात, तो केशसंभार तसाच दृष्टोत्पत्तीस पडत आहे. या रत्नजडित मुकुटाची शोभा वाढवण्यासाठी रत्नराज हवाच, परंतु आचार्य म्हणतात हे जगन्माते, तुझ्या मस्तकावर केवळ अष्टमीचा चंद्रच शोभून दिसतो. तोच तुझ्या मुखकमलाच्या सौंदर्याला न्याय देतो.
त्यानंतर आचार्य अत्यंत नम्रपणाने देवीच्या चाफेकळी नाकाची शोभा वाढवणारी, मोत्यांनी जडवलेली नथ अर्पण करतात. देवीच्या कमळाच्या देठाप्रमाणे सुकोमल आणि रेखीव बोटांची शोभा वृद्धिंगत करणार्या रत्नजडित सुवर्णमुद्रा, अर्थात अंगठीही आचार्य अर्पण करतात. देवीच्या सिंहकटी स्वरूपाला शोभेल असा घुंगरू लावलेला अत्यंत सुंदर रत्नजडित कंबरपट्टा, आचार्य अत्यंत श्रद्धेने देवीच्या सन्मुख ठेवत आहेत. आचार्य देवीला म्हणतात, "हे आई, तुझ्या पदन्यासाने या कंबरपट्ट्यातील घुंगरांचा अत्यंत मोहक असा ध्वनी ऐकू येत आहे. या मंगल ध्वनीने माझे क्षुब्ध चित्त शांत होत आहे.
मानसपूजेच्या अंतिम टप्प्यात आचार्य देवीच्या चरणांची शोभा वाढवण्यासाठी, देवीचे गुडघे आणि पोटर्या आच्छादित करणारी सुवर्ण आभूषणे आणि तिच्या पायात सुवर्ण पैंजण आणि चांदीच्या जोडवी अर्पण करतात. हे पैंजण आणि जोडवी रक्तवर्णी रत्नांनी सुशोभित आहेत.
ही समस्त आभूषणे आणि अलंकार श्री ललितादेवीच्या चरणी अर्पण करून, आचार्य श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिला साद घालतात ’हे जगन्माते, मी तुला हे अलंकार अर्पण केले आहेत, त्यांचा स्वीकार कर.’
देवीच्या स्वरूपाची इतकी विस्तृत कल्पना आणि तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवणारे हे अलंकार अर्पण करण्यासाठी, साधक हा परमहंसपदाला पोहोचलेला असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण देवीचे इतके सातत्यपूर्ण सान्निध्य केवळ परमहंसांनाच प्राप्त होते. ते देवीच्या राजवाड्यात तिच्या आजूबाजूला विहार करत, तिच्या अनुपम सौंदर्याला आपल्या डोळ्यांत साठवून घेत तृप्त होत असतात.
आदि शंकराचार्यांनी मानसपूजेच्या या टप्प्यावर देवीच्या सान्निध्याचाच हा अनुभव शब्दबद्ध केला आहे. देवीच्या या स्वरूपाचे चिंतन करणारा साधक, हा ध्यानाच्या उच्च पातळीला प्राप्त करतो. तो या अवस्थेत तल्लीन होऊन जातो. देवीच्या या स्वरूपाला आपल्या नेत्रांत साठवताना आणि कल्पनेला शब्दबद्ध करताना, त्याचे देहभान हरपते. त्याचे अष्ट सात्विक भाव जागृत होऊन, त्याच्या नेत्रांतून अश्रुधार सुरू होते. भक्तीच्या या परमोच्च अवस्थेला प्राप्त साधकाचे या टप्प्यावर देहभान हरपून तो आत्मरूपाने देवीशी तादात्म्य पावण्यास, स्वतःचा आत्मा देवीच्या स्वरुपात विलीन करून टाकण्यास मानसिक पातळीवर सिद्ध होतो.
श्लोक क्रमांक ७
सर्वाङ्गे घनसारकुङ्कुमघनश्रीगन्धपङ्काङ्कितं
कस्तूरीतिलकं च फालफलके गोरोचनापत्रकम्|
गण्डादर्शनमण्डले नयनयोर्दिव्याञ्जनं तेऽञ्चितं
कण्ठाब्जे मृगनाभिपङ्कममलं त्वत्प्रीतये कल्पताम्॥
आचार्यांनी मागील श्लोकात देवीला मनोमनी अलंकार अर्पण केले, त्याचप्रमाणे आता ते देवीच्या सौंदर्याला सुगंधाच्या माध्यमातून अधिक अनुपम स्वरूप प्रदान करणार आहेत.
आचार्य म्हणतात, हे देवी! मी तुझ्या शरीरावर लावण्यासाठी चंदनाचा लेप तयार केला आहे. त्यात उत्तम प्रतीचा कापूर आणि केशर मिसळले आहे. तुझ्या भालप्रदेशाची अर्थात कपाळाची शोभा वृद्धिंगत करण्यासाठी, मी सुगंधी कस्तुरीचा टिळा अर्पण करत आहे. तुझे सुकोमल गाल एखाद्या आरशाप्रमाणे पारदर्शक आहेत. त्यांची त्वचा अत्यंत नितळ आहे. या सुंदर गालांना लावण्यासाठी मी गोरोचन आणले आहे. तुझ्या नेत्रांसाठी सुशोभित अंजन आणले असून, तुझ्या कमलपुष्पासमान स्निग्ध आणि सुंदर गळ्याला लावण्यासाठी विशुद्ध कस्तुरीचा लेप तयार केला आहे. तू या सर्व सुगंधी द्रव्यांना धारण करून, माझ्या या मानसपूजेला परिपूर्णत्व प्रदान कर.
या सुगंधी द्रव्यांची लक्षणे कोणती आहेत?
चंदन, कापूर व केशराचे लेपन देहाला लावले आहे, हे तीनही घटक शुद्धता, ताजेपणा आणि तेज यांचे प्रतीक आहेत. हे शरीराला फक्त थंडावा देत नाहीत, तर वातावरणात एक दैवी सुवास दरवळवतात. भालप्रदेशी कस्तुरीचा टिळा लावला आहे. कस्तुरी ही हरिणाच्या शरीरातील नैसर्गिक स्राव असतो, ज्याचा सुगंध अनेक मैल पसरतो. शंकराचार्य सौंदर्यलहरीत तिच्या कपाळाची तुलना अर्धचंद्राशी करतात. ही तुलना केवळ रूपासाठी नाही, तर देवीच्या बुद्धी, ज्ञान व समत्वाच्या व्यापकतेसाठी केली आहे.
गोरोचन हे गायीच्या देहापासून प्राप्त केले जाते. गोरोचन हे कार्यसिद्धी घडवते. देवीचे गाल आरशासारखे चकाकतात आणि त्यात शिवाला समस्त विश्वाची झलक दिसते. शिव आणि शक्तीने आकाराला आणलेल्या, या जगताची लीला शिव तिच्या मुखकमलात बघतो.
अंजन (काजळ) म्हणजे, देवीच्या नेत्रांना वळण देणारे सौंदर्य. अंजनाची वक्ररेषा तिच्या डोळ्यांतील मंद स्मित, करूणा आणि विलक्षण तेज अधोरेखित करते. हे अंजन केवळ देखणेपणासाठी नव्हे, तर ज्ञानदृष्टी वाढवणारे, दोष नष्ट करणारे आहे.
जगदंबेचा गळा म्हणजे कमलासारखा कोमल, परंतु तेजस्वी. आचार्य या गळ्यावर शुद्ध कस्तुरीचा लेप करून, आपली श्रद्धा तिच्या अस्तित्वाच्या चरणी अर्पण करत आहेत.
या सुगंधलेपनाचा एक अर्थ असाही होतो की, शक्तीउपासक या नात्याने आचार्य देवीच्या लौकिकाचा, सर्वव्यापी आणि सर्वसाक्षीस्वरूपाचा विस्तार जगतात सर्वत्र पसरवण्याचा आपला निर्धार व्यक्त करत आहेत. कारण आचार्यांनी धर्मग्लानी दूर करून, शक्तीउपासनेची विखंडित परंपरा पुनरुज्जीवित केली आहे. हे कार्य देवीच्या सुगंधाप्रमाणे सर्वत्र विस्तार पावो, हीच भावना आचार्य इथे व्यक्त करत आहेत.