पाकव्याप्त काश्मीर भाजप सरकारच परत आणणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गर्जना

30 Jul 2025 20:59:56

नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीर’ (पीओके) ही काँग्रेसची ऐतिहासिक चूक आहे. ही चूक आम्हीच सुधारणार असून भाजपचे सरकारच पीओके परत आणणार, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.

‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेस राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व न देता राजकीय फायद्यासाठी लांगुलचालन करणे हे काँग्रेसचे प्रारंभापासूनचे धोरण राहिलेले आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच पीओकेची समस्या निर्माण झाली आहे, मात्र त्यांच्याकडूनच “पीओके कधी घेणार” असा प्रश्न विचारला जात आहे. पाकला काश्मीर देईन पीओके तयार करण्याचे काम काँग्रेस नेतृत्वाने केले आहे. मात्र, पीओके परत आणण्याचे काम भाजपचे सरकारच करेल; अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी दिली.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांनी ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू – काश्मीर पोलिसांनी ‘ऑपरेशन महादेव’ राबवून पहलगाम हल्ला घडविणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार केकेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड कमांडर सुलेमान उर्फ फैसल, लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड दहशतवादी अफगाण आणि लष्कर-ए-तोयबाचाच आणखी एक धोकादायक दहशतवादी जिब्रान याचा समावेश होता. हे तिघेही दहशतवादी बैसरन खोऱ्यात नागरिकांच्या हत्येत सहभागी होते. सुरक्षा दलांनी केलेल्या कठोर परिश्रमानंतर त्यांना ठार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला जम्मू – काश्मीरमधील दहशतवाद, ईशान्य भारतातील फुटीरतावाद आणि नक्षलवाद हा वारसा देशात दिर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसने दिल्याचा टोला गृहमंत्र्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, कलन ३७० काढून जम्मू – काश्मीरमधील दहशतवाद्यांची इकोसिस्टीम मोडण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील फुटीरतावाद संपुष्टात येत असून नक्षलवादही अंतिम श्वास मोजत आहे. राष्ट्रीय सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य असलेल्या सरकारमुळेच हे शक्य होत आहे. काँग्रेसने राष्ट्रीय हितांना कधीही महत्त्व दिले नाही. आतादेखील त्यांचे नेते ऑपरेशन सिंदूरचे यश आणि ऑपरेशन महादेवच्या वेळेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. असे असल्यानेच ३० वर्षे त्यांना विरोधात बसण्याची वेळ येईल, असाही टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी लगावला आहे.

Powered By Sangraha 9.0