मुंबई : (NISAR to be launched from Sriharikota) भारत आणि अमेरिकने संयुक्तपणे विकसित केलेल्या 'नासा -इसो सिंथेटिक अॅपर्चर रडार' (निसार) या अत्याधुनिक उपग्रहाचे बुधवारी दि. ३० जुलैला श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या लाँच पॅडवरून जीएसएलव्ही एफ-१६ (GSLV-F16) रॉकेटच्या साहाय्याने संध्याकाळी पाच वाजून ४० मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. हे रॉकेट निसारला ७४७ किलोमीटर उंचीवर, ९८.४ अंशांच्या झुकाव असलेल्या सूर्य-समकालिक कक्षेत ठेवेल.
'निसार' उपग्रहाचे वजन २३९३ किलो इतके असून या मोहिमेसाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आजपर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा उपग्रह आहे. हवामान बदलांचे परिणाम, ज्वालामुखी भूकंप, दरडीमुळे होणारे बदल, जैवविविधतेतील बदल अभ्यासासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी निसार कडून मिळणाऱ्या नोंदींचा वापर केला जाईल.
निसार उपग्रह मोहिमेची वैशिष्ट्ये:
-
पृथ्वीवरील भूरचना, पिके, जंगले, पाणथळ जागा तसेच बर्फाळ प्रदेशांमध्ये होणारे सूक्ष्म बदल टिपण्याची क्षमता
- पृथ्वीच्या ठराविक भागाला दर १२ दिवसांनी भेट देऊन मायक्रोवेव्हच्या साहाय्याने पाच ते १०० मीटरच्या रिझोल्युशनने २४० किलोमीटर रुंदीच्या पट्ट्यांचे चित्रण करणार
- हा रडार उपग्रह असल्याने वर्षभर कोणत्याही हवामानाच्या स्थितीत, दिवसा आणि रात्री जमिनीच्या नोंदी घेण्याची क्षमता
- जमिनीपासून ७४७ किलोमीटर उंचीवर सूर्य-समकालिक कक्षेत या उपग्रहाला प्रस्थापित केले जाणार
- निसार कडून मिळणाऱ्या नोंदी जगभरातील शास्त्रज्ञांसाठी मोफत उपलब्ध होणार आहेत