ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे हा भारतीय सेनेचा अपमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; या प्रवृत्तीचा धिक्कार करतो

30 Jul 2025 19:24:41

मुंबई : ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे हा दहशतवादी हल्लात मृत पावलेल्या २६ भारतीयांचा, त्यांच्या परिवाराचा आणि भारतीय सेनेचा अपमान असून या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या विधानावर त्यांनी बुधवार, ३० जुलै रोजी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणण्याचा अर्थ दहशतवादी हल्लात मृत पावलेल्या २६ भारतीयांचा आणि त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखे आहे. ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या दहशतवाद्यांचे नेटवर्क उध्वस्त केले, त्या सेनेचा अपमान करण्यासारखे आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानने आपल्यावर डागलेले १ हजार मिसाईल आणि ड्रोन हवेतच नष्ट करून टाकले, त्या सेनेचा अपमान करण्यासारखा हा विषय आहे. त्यामुळे जर या देशात सेनेचा अपमान करणारे नेते असतील तर त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह लागणे स्वाभाविक आहे. यावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेली शंका योग्य वाटते. या विधानाचा मी निषेध करतो आणि या प्रवृत्तीचा धिक्कार करतो," असे ते म्हणाले.

काँग्रेस उघडी पडली

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत सगळे सत्य आपल्यासमोर ठेवले. काँग्रेस एकप्रकारे उघडी पडली आहे. पंतप्रधान मोदीजींचे एक वाक्य काँग्रेस सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. जी भाषा पाकिस्तानचे नेते वापरतात तीच भाषा काँग्रेसचे नेते वापरत आहेत, हे त्यांचे वाक्य होते आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विधानांतून तीच भाषा समोर आली आहे," अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Powered By Sangraha 9.0