भारतातील वाघांच्या घरात ९ छोट्या रानटी मांजरी; रानमांजराचा अधिवास सर्वाधिक, वाघाटी दुसऱ्या क्रमांकावर

30 Jul 2025 16:36:17
nine small cat species
(छायाचित्र - डाॅ. शार्दुल केळकर)


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 'भारतीय वन्यजीव संस्थान'कडून (डब्लूआयआय) देशातील लहान रानटी मांजऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा अवलोकन करणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे (nine small cat species). या अहवलाच्या माध्यमातून देशातील व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या रानटी मांजराच्या अधिवास क्षेत्राच्या विस्ताराचे विश्लेषण करण्यात आले आहे (nine small cat species). सद्यपरिस्थिती देशातील व्याघ्र प्रकल्पात नऊ प्रजातीच्या लहान रानटी मांजरांचा आढळ असल्याचे निदर्शनास आले आहे. (nine small cat species)
 
वाघ, सिंह आणि बिबट्या या मार्जार कुळातील आकाराने मोठ्या मांजरी आहेत. तर रानमांजर, वाघाटी, लेपर्ड कॅट या आकाराने लहान मांजरी आहेत. बऱ्याचवेळा वाघ-बिबट्यांच्या तुलनेत आकाराने लहान असणाऱ्या या रानटी मांजरांच्या प्रजातींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या रानटी मांजऱ्याच्या अधिवास क्षेत्राच्या विस्ताराचा अभ्यास 'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी केला. मात्र, हा अभ्यास केवळ देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पार पडला. २०१८ ते २०२२ या काळात १८ राज्यांमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेसाठी 'डब्लूआयआय'ने व्याघ्र प्रकल्पांमध्ये कॅमेरा ट्रॅप लावले होते. या काळात लहान रानटी मांजऱ्यांच्या प्रजातींचे एकूण २४ हजार ८०० छायाचित्र टिपली गेली. त्यामाध्यमातून १७ हजार रानटी मांजरांची वैयक्तिक ओळख पटवण्यात आली. या छायाचित्रांचे अवलोकन करुन 'स्टेटस आॅफ स्माॅल कॅट - इन दी टायगर लॅण्डस्कॅप आॅफ इंडिया' हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
 
 
या अभ्यासाच्या माध्यमातून भारतातील व्याघ्र प्रकल्पामधून कॅराकल (शशकर्ण), फिशिंग कॅट (मासेमार मांजर), गोल्डन कॅट (सोनेरी मांजर), मारबर्ल्ड कॅट, लेपर्ड कॅट, क्लाऊडेड लेपर्ड, रस्टी स्पोटेड कॅट (वाघाटी), जंगल कॅट (रानमांजर) आणि डेजर्ट कॅट या नऊ प्रजातींची नोंद करण्यात आली. यामधील सर्वाधिक प्रजाती आसाम आणि पश्चिम बंगाल राज्यात (प्रत्येक सहा) आढळून आल्या आहेत. महाराष्ट्रात रानमांजर, वाघाटी आणि लेपर्ड कॅटची नोंद करण्यात आली आहे. राज्यात ९० सालच्या दशकात मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून डेजर्ट कॅटची देखील नोंद आहे. मात्र, आता ही प्रजात राज्यात आढळत नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये लेपर्ड कॅटच्या अधिवास क्षेत्राच्या विस्तारामध्ये वाढ झाल्याचेही या अहवालाच्या माध्यमातून निदर्शनास आले आहे.
 
 

सर्वाधिक अधिवास रानमांजरीचा
या अहवालाच्या माध्यमातून देशातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वाधिक अधिवास क्षेत्राचा विस्तार हा रानमांजराचा असल्याचे समोर आले आहे. रानमांजराच्या अधिवासाचा विस्तार हा ९५ हजार २७५ चौ.किमी क्षेत्रावर पसरलेला आहे. त्याखाली वाघाटी (७० हजार ०७५ चौ.किमी), लेपर्ड कॅट (३२ हजार ८०० चौ.किमी), डेजर्ट कॅट (१२ हजार ५०० चौ.किमी), मासेमार मांजर (७ हजार ५७५ चौ.किमी), क्लाऊडेड लेपर्ड (३ हजार २५० चौ.किमी), मारबर्ल्ड कॅट (२ हजार ३२५ चौ.किमी), सोनेरी मांजर (१ हजार ८५० चौ.किमी) यांचा समावेश आहे. तर शशकर्ण मांजर ही दुर्मीळ असल्याने तिची पुरशी छायाचित्र टिपली गेलेली नाहीत.
Powered By Sangraha 9.0