इस्रो - नासाचा संयुक्त उपग्रह 'निसार' चे यशस्वी प्रक्षेपण! भारत - अमेरिका सहकार्याचा नवा अध्याय

30 Jul 2025 19:27:18

श्रीहरिकोटा : (GSLV-F 16 successfully launches NISAR satellite from Sriharikota) नासा आणि इस्रोच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेली एक महत्त्वाकांक्षी मोहीम — 'निसार' अर्थात नासा -इस्त्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार'. या मोहिमेअंतर्गत बुधवार दि. ३० जुलै रोजी, सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी, हा उपग्रह श्रीहरिकोटा येथून GSLV-F16 रॉकेटद्वारे अंतराळात झेपावले आहे. हे रॉकेट उपग्रहाला सूर्य-समकालिक कक्षेत म्हणजेच सन सिंक्रोनस ऑर्बिट मध्ये ७४७ किमी उंचीवर प्रस्थापित करेल.


निसार उपग्रह पृथ्वीवरील अतिसूक्ष्म भौगोलिक आणि पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण आणि नोंदी घेण्याचे काम करणार आहे. याद्वारे पृथ्वीवरील भूरचना, पिके, जंगले, पाणथळ जागा तसेच बर्फाळ प्रदेशांमध्ये होणारे सूक्ष्म बदल टिपता येणार आहेत. हा रडार उपग्रह असल्याने दिवसा किंवा रात्री, पावसात किंवा ढगाळ हवामानात देखील तो प्रभावी निरीक्षण करू शकतो. निसार कडून मिळणाऱ्या नोंदी जगभरातील शास्त्रज्ञांसाठी मोफत उपलब्ध होणार आहेत.

या उपग्रहाचे वजन २३९३ किलो इतके असून या संपूर्ण मोहिमेसाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आजपर्यंतचा सर्वात महागडा आणि सर्वात शक्तिशाली पृथ्वीचे निरीक्षण करणारा हा उपग्रह आहे. निसार केवळ एक उपग्रह नाही, तर पृथ्वीच्या भविष्याकडे पाहणारा एक अचूक वैज्ञानिक दृष्टीकोन आहे.



Powered By Sangraha 9.0