मुंबई : बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने कर्जत मार्गावरील बदलापूर वांगणी मार्गावर खोळंबा झाला. सकाळी कार्यालयीन वेळेत मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु होती. अप आणि डाऊन मार्गावरची कर्जतवरुन सुरु असणारी वाहतूक बरच वेळ खोळंबली. मुंबई पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसचाही या लोकल वाहतुकीमुळे खोळंबा झाला.
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांगणी रेल्वे स्थानकातील ड्युटीवरील अंमलदार पोलीस शिपाई कदम यांनी माहिती देताना सांगितले की बदलापूर रेल्वे स्टेशन मास्टर यांना सकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती सकाळी ६:४० वाजता मिळाली. त्यानंतर तात्काळ कर्जत दिशेने डाऊन लाईनवरील संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली. कल्याण ते कर्जत दरम्यान जवळपास दीड तास डाऊन लाईनवर वाहतूक विस्कळीत झाली होती.