मुंबई : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२३-२४ करिता जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण १२ ऑगस्ट २०२५ रोजी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील पाटकर सभागृहात करण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांद्वारे दिली.
या वर्षी शहरी विभागातील चार आणि ग्रामीण विभागातील तीन ग्रंथालयांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शहरी विभागासाठी पुरस्काराची रक्कम १ लाख ते २५ हजार, तर ग्रामीण विभागासाठी ७५ हजार ते २५ हजार रुपयांच्या रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार अंतर्गत राज्यस्तरावर दोन आणि विभागस्तरावर पाच कार्यकर्त्यांची निवड झाली आहे. तसेच उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार विभागस्तरावर सहा जणांना जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांसाठी २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यातील वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे, सामाजिक व शैक्षणिक समृद्धीसाठी ग्रंथालयांची भूमिका अधिक प्रभावी करणे आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या संस्थांना प्रोत्साहित करणे, हा पुरस्कार वितरणाचा मुख्य उद्देश असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.