मानवी तस्करी प्रकरणातील नन्सवरील कारवाईने विरोधकांना पोटशूळ? विहिंपचा काँग्रेस व के.सी. वेणुगोपाल यांच्यावर हल्लाबोल

30 Jul 2025 21:18:37

मुंबई : छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावर अ‍ॅसीसी सिस्टर्स ऑफ मेरी इमॅक्युलेट या ख्रिस्ती संघटनेच्या दोन नन्सना एका तरुणासह नुकतीच अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि छत्तीसगड धर्मस्वातंत्र्य कायदा, १९६८ अंतर्गत मानवी तस्करी आणि धार्मिक परिवर्तनाचे आरोप लावण्यात आले आहेत. याविषयी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, छत्तीसगडमध्ये जनजातींच्या बेकायदेशीर धर्मांतराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर काँग्रेसी ख्रिस्ती इकोसिस्टम सक्रिय झाली असून, मानव तस्करीत गुंतलेल्या दोन नन आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे.

याविषयी एक व्हिडिओ प्रकाशित करत त्यामध्ये डॉ. जैन यांनी म्हटले की, छत्तीसगडच्या नारायणगड येथील तीन जनजाती मुलींसोबत दोन नन आढळून आल्या. संशयास्पद हालचालीमुळे दुर्ग रेल्वे स्टेशनवर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना बोलावले आणि पोलिसांनी मानव तस्करी व बेकायदेशीर धर्मांतराच्या आरोपाखाली दोघी नन्सना ताब्यात घेतले. हे आरोप पहिल्यांदाच झालेले नाहीत. यापूर्वीही अनेकदा चर्चवर बेकायदेशीर धर्मांतर व मानव तस्करीचे आरोप झाले आहेत. २०१८ मध्ये रांचीमधील निर्मल हृदय आश्रमातून २८० मुले गायब झाल्याची बातमी समोर आली होती.

पुढे त्यांनी म्हटले की, जेव्हा चर्च बेकायदेशीर कृतींत सापडतो, तेव्हा संपूर्ण हिंदूविरोधी इकोसिस्टम त्यांच्या समर्थनार्थ उभी राहते. राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपालसारखे काँग्रेसी नेते त्यांच्यासोबत उभे राहतात. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा संसद भवनात काही काँग्रेस खासदारांनी आरोपी ननच्या बाजूने आंदोलन केलं, आणि केवळ एवढंच नाही तर केरळमधील काही खासदार व राजकीय नेते छत्तीसगड सरकारवर दबाव टाकण्यासाठी रायपूरमध्ये जाऊन आरोपी ननच्या समर्थनार्थ उभे राहिले.

सेवेच्या नावाखाली धर्मांतर का?

नन्स हिंदू वस्त्यांमध्ये धर्मांतरासाठी का आग्रही आहेत? सेवेच्या नावाखाली धर्मांतर का करत आहेत? असे प्रश्न यावेळी सुरेंद्र जैन यांनी केले. ते म्हणाले, मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की त्यांनी मुस्लिम वस्त्यांमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करावा, मग त्याचे परिणाम त्यांना कळतील. हिंदू सहिष्णु आहे, पण याचा अर्थ असा नाही की तो आपल्या समाजातील लोकांचे बेकायदेशीर धर्मांतर सहन करेल किंवा आपल्या मुली-महिलांवर असा अन्याय सहन करेल.”

धर्मांतरविरोधी केंद्रीय कायदा आवश्यक

“सर्व राजकारणी व समाजशास्त्रज्ञांना मी विनंती करतो की त्यांनी चर्चला या बेकायदेशीर कृत्यांपासून थांबवण्यासाठी दबाव टाकावा आणि केंद्र सरकारकडे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी धर्मांतरविरोधी केंद्रीय कायदा तयार करावा, जेणेकरून आपल्या मुली, समाज व भोळेभाबडे हिंदू हे त्यांच्या कपटी कारस्थानांचा बळी ठरणार नाहीत., असे जैन यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0