‘मुंबई ते मुंबई या’ माझ्या पुस्तकाचा आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा दि. १९ जुलै रोजी डॉ. भानूबेन नानावटी कलाघर, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जरी असला, तरी त्यातून समाजमन प्रतित झाले. त्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
दि.१९ जुलै, शनिवार. खरं तर आषाढ चालू, पण आज श्रावणसरी अधूनमधून बरसत होत्या. संध्याकाळी ४.३० वाजल्यापासून हळूहळू आप्तेष्ट नंदादीप विद्यालयात येऊ लागले. तेथे १९९४ सालापासूनच्या रोजनिशी, नीला वर्तक (आईने) लंडन आणि युरोपमधील अनुभव लिहिलेले हस्तलिखित, इंग्लंडमधील लॅण्ड लेडीने दिलेले वडिलांचे स्टॅम्प कलेक्शन, पुस्तकातील छायाचित्रांचे फोटो अल्बम, परदेशातील विविध वस्तू, माझे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले विविध लेख आणि हो, बाबांचा १९७०च्या दशकातील ग्रामफोन, ज्यावर बिस्मिल्लांच्या शहनाईची रेकॉर्ड वाजत होती. ते बघून मंडळी प्रत्यक्ष ‘कलाघर’ येथे येऊन स्थानापन्न होत होती. ठीक ५ वाजता मला व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या माणसाने ‘थम्प्स अप’ केले. मिलिंद आपटेने "कार्यक्रम सुरू करायचा का?” म्हणत प्रेक्षकांना साद घातली आणि मला मंचावर बोलावले.
‘कलाघर’ म्हणजे मी जिथे माध्यमिक शिक्षण घेतले, त्या नंदादीप विद्यालयातील अत्यंत स्टेट ऑफ द आर्ट ऑडिटोरियम. पहिल्या सत्राची सुरुवात प्रेक्षकांच्या स्वागताने झाली आणि मग मिलिंदने माझ्या पुस्तकाचा १९९२ ते २०२२ हा ३० वर्षांचा प्रदीर्घ प्रवासाचा पट उलगडायला सुरुवात केली, अर्थात मुलाखतीच्या माध्यमातून. १९९२ साली मी पहिल्यांदा मुंबई सोडली, अर्थात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी मी पुण्यात गेलो, ते भारती विद्यापीठात. तेव्हा मुंबईची ओढ असल्यामुळे जेव्हा केव्हा छोटीशी सुटी मिळायची, तेव्हा मुंबईत ट्रेनने येणे व्हायचे. असेच एकदा पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे पॅसेंजर ट्रेन कर्जतला तीन तास रखडली आणि त्यादरम्यान मी माझे पुण्यातील अनुभव डायरीत नोंदवण्यास सुरुवात केली. तेव्हा पुस्तक लिहायचे असे काहीच मनात नव्हते, पण कळत नकळत पुस्तकाची मुहूर्तमेढ तेव्हा रोवली गेली. महाविद्यालयामधील सगळ्यांचेच किस्से अजरामर असतात. मला पहिला भेटलेला सायकलमित्र शैलेश डोंगरे आजही उपस्थित होता. सायकलवरून तो धनकवडी ते शिवाजीनगर डबलसीट सोडायचा. चहा आणि क्रीमरोलवरून चहाच्या टपरीवर केदार तुंगारेची किरकोळ बाचाबाची झाली आणि ते प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. अशा काही आठवणींना उजाळा दिला. माझ्या पहिल्या नोकरीत (नेलको टाटाची कंपनी) असताना ‘बॉम्बे हाय’ म्हणजे ‘ओएनजीसी’च्या ऑईल प्लॅटफॉर्मवर समुद्रात जाणे झाले. तेथील लाईफ(जीवन) खूपच वेगळे होते, प्लॅटफॉर्म टू प्लॅटफॉर्म हेलिकॉप्टरचा प्रवास आणि एकदा गेले की १५ दिवस घरच्यांशी संपर्क जवळपास नाहीच. निरंजन व्यवहारे जो तेथे माझ्या सोबत होता, त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवला होता (तो सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्यामुळे येऊ शकत नव्हता) दि. ८ ऑगस्ट १९९९ रोजी पहिल्यांदा लंडनला पाय लागला. तेथेही हिंदू स्वयंसेवक संघात जाणे झाले. लीड्समध्ये असताना विव ह्यूलॅण्डच (ब्रिटिश लॅण्ड लेडी) घर रेंटने घेतले होते. तिनेही लॅण्ड लेडी ते फ्रेंडशिप हा प्रवास व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून व्हॉट्सअँप केला होता, तो दाखवला.
‘महाकुंभ २०२५’. लंडनमधील प्रेषित (मास्टेक कंपनीमध्ये ओळख झालेला मित्र) महाकुंभला जायचे म्हणून माझे जाणे झाले, त्याने त्रिवेणी संगमातील शाही स्नान, हेलिकॉप्टर राईड आणि लेझर-शोसंबंधी त्याच्या अनुभवांची क्लिप पाठवली होती. ती दाखवली आणि मग माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम आटोपता घेतला. दुसर्या सत्रात ज्यांच्यासोबत माझे प्रवास घडले, अशा माझ्या मित्रांच्या मुलाखती झाल्या. अर्थात मिलिंद आपटे हेच मुलाखतकार होते. महाविद्यालयामधील (१९९२ पासून असलेल्या मैत्रीमुळे) शैलेश डोंगरे, शैलेश नगरकर, केदार तुंगारे, विजय शिंदे आणि धनंजय गोवंडे सपत्निक मंचावर आले. शैलेश आणि मी अनेक ठिकाणी एकत्र होतो. त्याच्यासोबत मी पुण्यात सेंद्रिय शेतमाल विक्रीचा उपक्रम केला. त्याचे अनुभव त्याने सांगितले. शैलेश नगरकर हा पुण्यातील एकमेव मित्र, ज्याचा शनिवारवाड्याशेजारी वाडा होता. त्यामुळे त्याने त्या वाड्यातील आठवणी सांगितल्या. केदार तुंगारेकडे मी अमेरिकेत अटलांटामध्ये गेलो होतो, त्याने मला उछछ, कोक फॅक्टरी दाखवली होती, त्याबद्दल तो बोलला. ब्रायटन (इंग्लंडमधील समुद्र किनारा, जेथे स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘ने मजसि ने’ स्फुरले)मध्ये आणि नाशिकच्या कुंभमेळ्यात सोबत आलेल्या डॉ. विजय शिंदेने त्याच्या आठवणी सांगितल्या, तर धनंजय गोवंडेने शनिवारवाड्याजवळ शैलेश डोंगरेच्या झालेल्या वादातून एकाकडून कानशिलात पडली होती, हा किस्सा सांगितला. मंचावर या सर्व मित्रांबरोबर एक ग्रुप फोटो झाला आणि मग माझे शालेय मित्र मंचावर आले. राजेश शेट, जो आता सीए आहे. त्याने मी सन्मित्र मंडळामध्ये खजिनदार हा अनुभव कसा राहिला हे सांगितले. समीर करमरकर जो आता शेतकरी आहे, त्याच्या शेतावर २०१५ साली जाणे झाले.
तसेच आमच्या शाळेच्या ग्रुपबरोबर राजगड ‘ओव्हर नाईट ट्रेक’बद्दल गमतीजमती सांगितल्या. समीरची आत्या कृषिभूषण वसुधा यांनी आम्ही सेंद्रिय सेतू (पारगाव येथील सेंद्रिय शेतीप्रकल्प) आणि मी कसा जोडला गेलो, त्यातून मी आणि शैलेशने onest या उपक्रमांतर्गत पुण्यात शेतमाल विक्री (केवळ पर्यटक म्हणून शेती बघितली नाही, तर शेतमाल वितरणासाठी कृतीही केली) याबद्दल कौतुक केले. त्यांच्या सोबतही ग्रुप फोटो झाला. अर्थात मंचावर तिघेच असले, तरी प्रेक्षकात अधिक दहाजण होते. त्यामुळे त्यांनाही स्टेजवर बोलावून एक ग्रुप फोटो झाला. ठरल्याप्रमाणे ७ ते ७.३० वाजता मध्यंतर झाले. मध्यंतरात उपमा, सॅण्डविच, जिलेबी असा काँटिनेंटल अल्पोपहार झाला आणि पुन्हा सर्वजण सभागृहात आले. तिसर्या सत्राच्या सुरुवातीला सुचिता (पत्नी), जान्हवी व शिवराज या कुटुंबीयांची फिरकी मिलिंदनेच घेतली. "बाबांबद्दल काही सांग,” म्हटल्यावर शिवराजने अगदी निरागसपणे सांगितले की, "बाबा सांगतात ते तसे बरोबर असते, पण मी काही ते ऐकत नाही” आणि सभागृहात एकच हशा पिकला. सुचिताची मुलाखत संपता संपता सभागृहातून एका महिलेने (बहुधा ती सुचिताच्या माहेरची असणार) आवाज दिला की, "अजितने एवढी भटकंती केली, याचे कारण सुचिताने घर सांभाळले, त्यामुळे खरे क्रेडिट सुचिताचेच आहे.” यानंतर प्रत्यक्ष प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आकांक्षा बापट यांनी ईशस्तवन म्हटले. मग मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे व डॉ. स्मिता दातार यांनी दीपप्रज्वलन केले. आईचा आज दुसरा स्मृतिदिन असल्यामुळे सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून आईला श्रद्धांजली वाहिली. डॉ. स्मिता दातार यांनी भाग-१ साठी खूप समर्पक प्रस्तावना लिहिली आहे. त्यांनी ’प्रवासवर्णन’ या लेखन प्रकाराचा इतिहास आणि लेखकाच्या प्रवासवर्णनाबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले. अगदी ‘ट्रॅव्हल गाईड’ वाटावे, असे बारिक सारिक तपशील लिहिले आहेत आणि प्रांजळपणे झालेल्या चुका किंवा तुम्ही प्रवास करताना काय करू नका, याचाही ऊहापोह केला आहे. त्यानी मत व्यक्त केले - "प्रवासात जे बघितले ते शब्दबद्ध तर केलेच, पण पुढे भारतात परत आल्यावर ते कृतीत उतरवले. त्यांना अजून अनेक प्रांत खुणावत आहेत आणि त्यांच्यातला असाच संवेदनशील माणूस जागृत राहावा आणि त्यांच्या लेखणीतून अनेक पुस्तके भविष्यात आपल्याला वाचायला मिळतील, अशी आशा करते.” यानंतर प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले, तसे त्यांनी जाहीर केले. हा कार्यक्रम ‘युट्यूब’च्या माध्यमातून लाईव्ह होता. प्रवीण यांनी भाग-२साठी अभिप्राय दिला आहे. त्यांच्या मते, पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे लेखकाचा पुनर्जन्म असतो. पायाला चाक आणि मनाला पंख असणारी माणसे उत्तम प्रवास करू शकतात.
माझ्याबदद्ल बोलताना ते म्हणाले, लेखकांचे वडील रेल्वेमध्ये. त्यामुळे आपोआपच आयुष्य रुळावर घडलेले. आईने पंढरपूरची वारी केली, पण अजितने भारतभर वारी केली आणि विश्वाचेही पंढरपूर केले.पुस्तकाबाबत म्हणाले, हे पुस्तक वाचताना केशवसुतांच्या ओळी आठवतात, "जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मला दिसतात.” या पुस्तकातील काही प्रसंग सांगताना ते म्हणाले, ”लेखकाने भिगवणबद्दल निरीक्षण लिहिलंय, "फ्लेमिंगोची फौजच्या फौज आमच्या स्वागतासाठी सज्ज होती.” इथे ‘फौज’ म्हणताना शस्त्र नाही, सौंदर्य आहे, निरागसता आहे. असे सगळे असल्यामुळे हा स्थळांचा प्रवास होत नाही, तर संस्कारांचा प्रवास होतो. महाकुंभवर लिहिताना अजित पुन्हा एक सर्जनशील धक्का देतात. ते लिहितात, "एकाने कुणीतरी ‘जय श्रीराम’ म्हटल्यावर सर्व जमलेले तीच घोषणा देतात. जात, भाषा, प्रांतवाद सगळे भेद गळून पडतात. हाच एक समान धागा आपल्या भारत देशाला एकत्र आणतो. या त्यांच्या वाक्यामुळे अजित वर्तक हे जे काही मन आहे, ते वाचायला मिळते आणि आशयघनताही जाणवते. भारताबाहेर हिंदू स्वयंसेवक संघ आहे आणि त्यात ‘विश्व धर्म की जय’ अशी प्रार्थना केलेली आहे. अशा प्रकारच्या नोंदींमुळेच पुस्तकाची उंची वाढते, जाडी नाही. मला असे वाटते, याची पुढची आवृत्तीपण लवकरच येईल, आपण मला प्रकाशनाला नक्की बोलावा, व्यासपीठावर आणखी कुणी ज्येष्ठ असतील, पण असा अनौपचारिक सोहळा अनुभवण्यासाठी मी श्रोत्यांत असेन आणि पहिली टाळी माझी असेल.” प्रवीण यांचे मनोगत झाल्यावर पुस्तकासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी अनेक मित्र नाशिक, पुण्याहून खास आले. त्या सर्वांना धन्यवाद दिले. प्रकाशन सोहळ्याची सांगता श्रीधर जोशीने पसायदान म्हणून केली. याचसाठी केला होता अट्टाहास! गेली तीन वर्षे या पुस्तकासाठी दिवस-रात्र काम चालू होते. ते आज मूर्तरूपात प्रकाशित झाले. हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस आहे.
अजित वर्तक
८०९७७९६०७०