ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले
03 Jul 2025 20:00:43
मुंबई, त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर!
राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले जातात. ते एकदा व्यासपीठावर उभे राहिले, की भाषण नव्हे, तर जणू नाट्यपटच उभा राहतो. जनतेच्या भावना पेटवणं, वातावरण उसळवणं, आणि एखादं लक्षवेधी वाक्य झाडून चर्चेचं केंद्र बनणं, ही त्यांची खास शैली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची भाषणशैली तुलनेने संथ, संयत आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी नसल्याचं त्यांच्या पूर्वीच्या भाषणांतून स्पष्ट दिसतं. त्यामुळे राज-उद्धव एकत्र आले तरी खरी अडचण ठरतेय ती शेवटचा माईक कोणाच्या हाती? कारण, राजकारणात शेवटचं भाषण म्हणजे नेतृत्वाची छाप. सभा कोण संपवतो, यावरूनच ‘नेता कोण’ हे ठरतं. त्यामुळे उबाठा आणि मनसेच्या आतल्या गोटात सध्या 'माईकपॉलिटिक्स' सुरू आहे.
या ‘विजयी सभेचा’ अजेंडा आजही स्पष्ट नाही. त्रिभाषा सूत्र रद्द करण्याचा निर्णय हा शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि जनभावनेचा परिपाक होता. पण या निर्णयावर 'आम्ही लढलो, आम्ही जिंकलो' असं म्हणत स्वतःचा विजय साजरा करायचा प्रयत्न सुरू आहे. एकत्र येण्यासाठी कारण हवं होतं, ते मिळालं... पण, आता उद्धव माघार घेणार, की राज ठाकरेंना गप्प बसवलं जाणार?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
सभा मराठीसाठी, की मुंबई पालिकेसाठी?
ही सभा खरंच मराठीसाठी आहे की मुंबई पालिकेसाठी?, हाही संशोधनाचा विषय. कारण, अजेंडा नाही, ठोस भूमिका नाही, रोजगार, शिक्षण, मराठी तरुणांचे भवितव्य, यावर भाष्य नाही. फक्त 'मराठी अस्मिते'चा मुद्दा घेऊन नवा इव्हेंट उभा करायचा, आणि त्या निमित्ताने अस्तित्व सिद्ध करायचे, असा हा सगळा प्रयत्न. उद्धव ठाकरे यांना पक्ष टिकवण्यासाठी राज ठाकरे यांची साथ हवी आहे. आणि राज ठाकरे यांना राजकीय पुनरागमनासाठी व्यासपीठ. त्यामुळे ही एकजूट मराठीवर आधारित नव्हे, तर हिशेबांवर आधारित वाटते.
हिंदी सक्ती करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो रद्द केला. उद्धव यांनी त्याचा विजयोत्सव साजरा करावा, हे हास्यास्पद. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले होते, ते राज ठाकरेंना आवडणार आहे का? झेंडे पाकिस्तानचे, भाषा काँग्रेसची, अशी उबाठाची अवस्था. सावरकरांवर राहुल गांधी काही बोलले, तर ते गप्प राहतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडलेली ही उबाठा आहे. अशी ही उबाठा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे हे दोन्ही समीकरण राजकारणासाठी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. - राम कदम, आमदार, भाजप