मुंबई, राज्यातील देवस्थानांच्या इनाम जमिनींवर बेकायदेशीर कब्जा आणि अपहार थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार स्वतंत्र कायदा आणणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी औचित्याच्या सूत्रांतर्गत लक्ष वेधले होते.
आ. अहिरे म्हणाल्या की, “राज्यात महसूल आणि वन विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या काही देवस्थानांच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी या जमिनींचा वैध वापर न होता, त्यावर खासगी व्यक्ती व संस्थांनी कब्जा केला आहे. त्यामुळे या जमिनी मूळ देवस्थानांना मिळाव्यात यासाठी सरकारने लक्ष घालावे.” त्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवस्थानच्या इनाम जमिनीविषयी सरकार कायदा करणार असल्याची माहिती सभागृहात दिली.