प्रत्येक जिल्ह्याच्या कोचिंग क्लासेस, कॉलेज आणि शाळांमध्ये 'SHE BOX' बसवा ; आ. चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बीड घटनेतील आरोपींचे सीडीआर तपासा

03 Jul 2025 15:38:34

मुंबई : प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या कोचिंग क्लासेस, कॉलेज आणि शाळांमध्ये 'SHE BOX' बसवावा यासह विविध सूचनांचे पत्र भाजप आ. चित्रा वाघ यांनी गुरुवार, ३ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

बीडमधील उमाकिरण शैक्षणिक संकुल या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे सूचनांचे निवेदन सुपूर्द केले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, "बीड घटनेतील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खारोटकर यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड दहशत आहे. या दोन्ही आरोपींचे मोठमोठ्या राजकीय लोकांशी संबंध आहेत. तसे फोटोही माध्यमांतून समोर आले आहेत. त्यामुळे त्यांचे सीडीआर चेक व्हायला हवे. शिवाय आरोपी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचीही सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा दिली जावी."

"तसेच या प्रकरणात आणखी काही मुलींवर अत्याचार झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सर्व पालकांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करून सर्व प्रकरणे बाहेर येणेही गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या कोचिंग क्लासेस, कॉलेज, शाळा यामध्ये "SHE BOX" बसवण्यात यावा. ज्यात मुली त्यांना होणारा त्रास गोपनीय पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतील आणि त्यावर कार्यवाही करता येऊ शकेल," अशी सूचना त्यांनी केली.

११२ हेल्पलाइनचा प्रचार प्रसार व्हावा

" महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी अतिशय प्रभावी असलेल्या ११२ या हेल्पलाइनचा प्रचार प्रसार व्हावा. संपूर्ण राज्यात खासगी कोचिंग क्लासेससाठी फीची मर्यादा तसेच यात शिकणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा याबद्दल नैतिक आणि कायदेशीर अशी व्यापक एसओपी शासनाने निर्गमित करावी," अशी मागणीही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Powered By Sangraha 9.0