शासकीय योजनेत सहभागी होण्यास रुग्णालयांकडून टाळाटाळ - आ. अतुल भातखळकर यांनी वेधले सभागृहाचे लक्ष
03 Jul 2025 20:13:55
मुंबई, भाजप आ. अतुल भातखळकर यांनी गुरुवार,दि. ३ जुलै रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांच्या सहभागाबाबत गंभीर मुद्दा उपस्थित केला. “मुंबई शहर आणि उपनगरात या योजनांत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी आहे. सरकारने ठरवलेल्या किंमती मुंबईतील रुग्णालयांना परवडत नसल्याने ते योजनेत सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. यावर सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे?” असा सवाल त्यांनी सभागृहात केला.
भातखळकर यांनी धर्मादाय रुग्णालयांमधील आरक्षित खाटांचा गरजू रुग्णांना पूर्ण लाभ मिळावा यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड तयार करण्याची मागणी केली. “सॉफ्टवेअरद्वारे रुग्णालयातील रिक्त खाटांची माहिती मंत्रालयात बसूनही मिळू शकेल. अशी व्यवस्था कधीपर्यंत लागू होईल?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी उत्तर देताना सांगितले की, “रियलटाईम माहिती देणारे सॉफ्टवेअर बहुतांश रुग्णालयांत लागू आहे. जे रुग्णालये याचे पालन करत नाहीत, त्यांना नोटीस देण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कडम 66 अंतर्गत कारवाई होईल. अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि रियलटाईम डेटा सार्वजनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नियुक्त करण्याचाही विचार आहे.”