मुंबई(Disha Salian death case): दिशा सालियनचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असून या प्रकरणात कोणताही लैंगिक अत्याचार किंवा हत्या झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केले होते. या प्रकरणात दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत त्यांच्या मुलीच्या मृत्यूला गूढ व अमानवी स्वरूप असल्याचे नमूद करत, सीबीआय आणि उबाठाचे वरळीतील आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, ८ जून २०२० रोजी, दिशाने मालाडमधील १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर कोणतेही लैंगिक अथवा शारीरिक हल्ल्याचे चिन्ह आढळले नाहीत. तिच्या मृत्यूवेळी ती दारूच्या नशेत होती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. प्रतिज्ञापत्रात पुढे नमुद केले की, दिशा मानसिक तणावात होती, तिचे कुटुंबीयांशी मतभेद होते आणि काही व्यावसायिक अडचणी तिला त्रासदायक ठरत होत्या.
सतीश सालियन यांचे गंभीर आरोप
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मार्च २०२५मध्ये दाखल केलेल्या याचिकेत दावा केला की, “तिच्या मृत्यूमागे बलात्कार आणि हत्या होती. काही प्रभावशाली व्यक्तींला वाचविण्यासाठी या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. त्यांनी याचिकेत पुढे म्हटले की, एफआयआर दाखल न करता तपास करणे हे बेकायदेशीर आहे.
आदित्य ठाकरे यांची न्यायालयात धाव;पुढील सुनावणी १६ जुलैला
आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करत न्यायालयाला विनंती केली की, कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकून घ्यावी. त्यांनी दावा केला की, सतीश सालियन यांची याचिका खोटी, निरर्थक आणि राजकीय हेतूने प्रेरीत आहे. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत पुढील सुनावणी १६ जुलैला ठेवली आहे.