नवी दिल्ली(Patanjali Ayurveda and Dabur Chyawanprash): 'पतंजली आयुर्वेद'ला डाबरच्या चवनप्राश उत्पादनाचा अपमान आणि विरोध करणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यापासून गुरुवार ,दि. ३ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने मनाई केली आहे. न्या. मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींविरोधात डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या अंतरिम अर्जाला मान्यता दिली.
या खटल्यात डाबर इंडियाची बाजू वरिष्ठ वकिल संदीप सेठी यांनी मांडली आहे. वकिल सेठी यांनी युक्तिवाद करताना न्यायालयासमोर म्हटले की, "पतंजलीचे उत्पादन फक्त ४७ औषधी वनस्पती वापरून तयार केले जाते, तरीही त्यात ५१ पेक्षा अधिक वनस्पती असल्याचा दावा केला जातो. पतंजली आपल्या उत्पादनात पारा वापरते, जो मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. पतंजलीने आपल्या जाहिरातींमध्ये डाबरच्या उत्पादनांचा 'सामान्य' म्हणून उल्लेख करून ब्रँडची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे."
पतंजलीकडून वरिष्ठ वकील जयंत मेहता यांनी बाजू मांडली. त्यांनी सेठी यांचे सर्व आरोप नाकारले. ते म्हणाले की “पतंजलीच्या उत्पादनांमधील सर्व घटक हे निर्धारित सूत्रानुसार आहेत आणि ते मानवी वापरासाठी सुरक्षित आहेत.”
न्या. मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने म्हटले की “ सध्यातरी पतंजलीला डाबरविरोधातील जाहिराती प्रसारित करता येणार नाहीत.” या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने १४ जुलै रोजी ठेवली आहे. ज्यामध्ये या प्रकरणाचा अधिक तपशीलवार आढावा घेऊन उचित कारवाई केली जाईल.